Pak vs Afg Odi : आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा धुमधडाका, बाबर आणि रिझवानला फॉर्मात आल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

अफगाणिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा वरचष्मा पाहायला मिळाला. मालिका 3-0 ने जिंकत व्हाईट वॉश दिला आहे. आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावला आहे.

Pak vs Afg Odi : आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा धुमधडाका, बाबर आणि रिझवानला फॉर्मात आल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानची मोठी कामगिरी, केली अशी कामगिरी की भल्याभल्यांना फुटेल घाम
| Updated on: Aug 26, 2023 | 11:27 PM

मुंबई : पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत अफगाणिस्तानला 3-0 ने लोळवलं आहे. यासह आशिया कप स्पर्धेपूर्वीची लिटमस टेस्ट पास केली आहे. पाकिस्ताने सर्वच खेळाडू फॉर्मात असून भारतासाठी धोक्याची घंटा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात चांगलाच जोर लावावा लागणार आहे असं दिसत आहे. इतकंच काय तर अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत करत पाकिस्तानने आयसीसी वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक गाठला आहे. त्यामुळे आशिया कप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानला लय सापडल्याचं दिसून येत आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 8 गडी गमवून 268 धावा केल्या आणि विजयासाठी 269 धावांचं आव्हान दिलं.

पाकिस्तानने दिलेलं विजयी धावांचं आव्हान गाठताना अफगाणिस्तानची सुरुवात अडखळत झाली. 100 धावांच्या आत 7 गडी तंबूत परतले. मात्र मुजीब ऊर रहमान याने कडवी झुंज धेम्याचा प्रयत्न केला. त्याने 37 चेंडूत 64 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. अफगाणिस्तानचा संघ 48.4 षटकात सर्वबाद 209 धावाच करू शकला. पाकिस्तानने हा सामना 59 धावांनी जिंकला. यात शदाब खानने 3, शाहीन आफ्रिदीने 2, फहीम अश्रफने 2, मुहम्मद नवाजने 2 आणि सलमान अली अघा याने एक गडी बाद केला.

पाकिस्तानकडून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने कमाल फलंदाजी केली. तिसऱ्या गड्यासाठी दोघांनी 100 धावांची भागीदारी केली. बाबरने 86 चेंडूत 60, तर रिझवाने 79 चेंडूत 67 धावा केल्या.

दोन्ही संघाचे खेळाडू

पाकिस्तान : फझर जमान, इमाम उल हक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सौद शकील, सलमान अली अघा, शदाब खान, मुहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वासिम ज्युनिअर

अफगाणिस्तान : रहमनुल्लाह गुरबाज, रियाज हस्सन, इब्राहिम झर्दान, हशमतुल्लाह शाहिदी, शाहिदुल्ला, गुलबदीन नईब, मोहम्मद नबी, राशीद खान, मुजी उर रहमान, फरीद अहमद, फजलहक फारुकी