
इस्लामाबाद | आगामी आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. पीसीबीने अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार इंझमाम उल हक यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पाकिस्तान क्रिकेटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. पीसीबीच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला इंझमाम याच्या अनुभवाचा चांगलाच फायदा होणार आहे.
इंझमाम उल हक यांची पुन्हा निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड
Former Pakistan captain Inzamam ul Haq has been appointed national men’s chief selector. pic.twitter.com/TnPdQaoXvW
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 7, 2023
इंझमाम यांनी याआधी 2016 ते 2019 या दरम्यान निवड समिती अध्यक्षपदाची सूत्र सांभाळली होती. इंझमाम निवड समिती अध्यक्ष असताना पाकिस्तानने 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. आता पुन्हा इंझमाम चीफ सिलेक्टर झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा पाकिस्तानचं लक्ष हे आशिया कप आणि वर्ल्ड कप ट्रॉफीकडे लागून राहिलं आहे.
इंझमाम उल हक यांनी पाकिस्तानचं 120 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. या 120 सामन्यांमध्ये 8 हजार 830 धावा केल्या आहेत. इंझमामने एकूण 25 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत. तसेच इंझमामने 378 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 हजार 739 धावा केल्या आहेत. या दरम्यान इंझमामने 10 शतकं आणि 83 अर्धशतकं केली आहेत.
दरम्यान इंझमाम उल हक यांना कर्णधारपदाचा पुरेसा असा अनुभव आहे. इंझमामने 31 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व केलं आहे. या 31 पैकी 11 सामन्यात पाकिस्तानचा विजय झालाय. तर तेवढ्याच म्हणजे 11 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. इंझमामच्या कर्णधारपदाची विजयी टक्केवारी ही 35.48 इतकी आहे.
तसेच इंझमामच्या कॅप्टन्सीत पाकिस्तानने वनडेत 87 पैकी 51 सामन्यात विजय मिळवलाय. तर 33 वेळा पराभूत व्हावं लागलंय. तर 9 सामने अनिर्णित राहिलेत. तसेच एकमेव टी 20 मध्ये इंझमामने टीमला जिंकून दिलं.