PM Modi Sri Lanka Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रीलंकेला टी 20 क्रिकेटचं श्रेय! म्हणाले…

PM Modi In Sri Lanka Tour : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका दौऱ्यात 1996 वर्ल्ड कप विजेत्या संघातील प्रमुख खेळाडूंची भेट घेतली. मोदींनी या खेळाडूंसह अनेक विषयांवर चर्चा केली.

PM Modi Sri Lanka Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रीलंकेला टी 20 क्रिकेटचं श्रेय! म्हणाले...
PM Modi with Sri lankan former cricketers
| Updated on: Apr 06, 2025 | 8:24 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या काही दिवसांपूर्वी श्रीलंका (PM Modi On Sri Lanka Tour 2025) दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात 3 महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं. या प्रकल्पांमुळे श्रीलंकेच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या दौऱ्यानिमित्ताने दोन्ही देशातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चाही झाली. नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यानिमित्ताने श्रीलंका क्रिकेट टीमच्या माजी दिग्गज खेळाडूंसह संवाद साधला. श्रीलंका क्रिकेट टीमने 1996 साली वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कप विजेता संघातील प्रमुख खेळाडूंसह मोदींनी चर्चा केली.

पंतप्रधान मोदींनी ऑलराउंडर सनथ जयसूर्या, वेगवान गोलंदाज चामिंडा वास, अरविंदा डी सिल्वा, मार्वन अट्टापट्टू, रवींद्र पुष्पकुमार, उपुल चंदना, कुमार धर्मसेना आणि रोमेश कलुविथराना यांच्यासह अनेक विषयांवर संवाद साधला आणि चर्चा केली. मोदींनी या दिग्गज खेळाडूंसोबतचे फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केले आहेत.

श्रीलंकेच्या आक्रमक शैलीने टी 20 क्रिकेटचा पाया!

टीम इंडियाने 1983 साली वर्ल्ड कप जिंकला. तर शेजारी श्रीलंकेने 1996 साली वर्ल्ड कप उंचावला. भारत आणि श्रीलंकाने वर्ल्ड कप जिंकणं हे क्रिकेट विश्वाच्या दृष्टीने परिवर्तनकारी असल्याचं मोदींनी नमूद केलं. तसेच मोदींनी श्रीलंकेच्या खेळाडूंनी 1996 साली केलेल्या फटकेबाजीचं विशेष कौतुक केलं.

श्रीलंकेने 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये आक्रमक शैलीने आणि खास अंदाजाने खेळ केला होता. श्रीलंकेने स्वीकारलेल्या याच आक्रमक शैलीमुळे टी 20 क्रिकेटच्या उदयाचा पाया घातला गेला, असं मोदींनी म्हटलं.

भारत-श्रीलंकेची मैत्री

पंतप्रधान मोदींनी या भेटीत भारताच्या 1996 सालच्या श्रीलंका दौऱ्याचा उल्लेख केला. त्यावेळी बॉम्बस्फोट झाल्यानंतरही भारताने खेळ भावनेतून श्रीलंका दौरा केला होता. तसेच श्रीलंकेत 2019 साली दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर मोदींनी तिथे भेट दिली होती. मोदींनी या चर्चेत या भेटीचा उल्लेखही केला.

श्रीलंकेच्या खेळाडूंची विनंती आणि मोदींचा प्रतिसाद

श्रीलंकेच्या माजी खेळाडूंनी या भेटीत उच्च दर्जाचे क्रिकेट मैदान बांधण्यासाठी पंतप्रधान मोदींना मदतीची विनंती केली. मोदींनी या विनंतीला ‘शेजारी प्रथम’ या नितीनुसार मदत करण्यास प्रतिबद्ध असल्याचं म्हणत होकार दिला आणि माजी खेळाडूंची मनं जिंकली.