रणजी स्पर्धेत कर्नाटकचा पंजाबवर एक डाव आणि 207 धावांनी विजय, शुबमन गिलचं शतक पाण्यात

रणजी स्पर्धेत मयंक अग्रवालच्या नेतृत्वात कर्नाटकने पंजाबचा धुव्वा उडवला. शुबमन गिलच्या संगाला एक डाव आणि 207 धावांनी पराभवाचं पाणी पाजलं. पहिल्याच डावात कर्नाटकने 475 धावा केल्या होत्या. मात्र हे आव्हान मोडताच आलं नाही.

रणजी स्पर्धेत कर्नाटकचा पंजाबवर एक डाव आणि 207 धावांनी विजय, शुबमन गिलचं शतक पाण्यात
| Updated on: Jan 25, 2025 | 4:44 PM

रणजी स्पर्धेत बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कर्नाटक आणि पंजाब हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. पण हा सामना हवा तसा झालाच नाही. कर्नाटकने पंजाबवर एकतर्फी मात केली. कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला. कारण पंजाबचा संघ पहिल्या डावात 55 धावा करून तंबूत परतला. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकने सर्वबाद 475 धावांचा डोंगर रचला. कर्नाटकचा स्मरण रविचंद्रनने द्विशतकी खेळी करत पंजाबच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. त्यामुळे पहिल्या डावातच पंजाबकडे 420 धावांची आघाडी होती. ही आघाडी मोडून विजयासाठी धावा देणं खूपच कठीण होतं. पंजाबचा संघ 213 धावा करू शकला. त्यामुळे कर्नाटकने पंजाबवर एक डाव आणि 207 धावांनी मात मिळवली.

दुसऱ्या डावात पंजाबची सुरुवात एकदम निराशाजनक राहिली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग 1 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या अनमोलप्रीत सिंगने 14 धावा करून विकेट दिली. दुसऱ्या बाजूने शुबमन गिलने आपल्या दमदार फटक्यांद्वारे लक्ष वेधून घेतले. तसेच संघासाठी एकाकी झुंज दिली आणि धावसंख्या दीडशे पार नेल्या. 171 चेंडूंचा सामना करणाऱ्या शुबमन गिलने 3 षटकार आणि 14 चौकारांसह 102 धावा केल्या. शतकानंतर श्रेयस गोपाल गिलला पायचीत करण्यात यशस्वी झाला.शुबमन गिलची विकेट मिळाल्याने कर्नाटकच्या गोलंदाजांनी सामन्यावर ताबा मिळवला आणि अखेरीस पंजाबच्या संघाला 213 धावांत गुंडाळले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कर्नाटक प्लेइंग 11: मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अनिश केव्ही, स्मरण रविचंद्रन, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, यशवर्धन परंतप, प्रसिद्ध कृष्णा, वासुकी कौशिक, अभिलाष शेट्टी.

पंजाब प्लेइंग 11: शुबमन गिल (कर्णधार), प्रभासिमरन सिंग (यष्टीरक्षक), अनमोलप्रीत सिंग, पुखराज मान, सनवीर सिंग, रमणदीप सिंग, जसिंदर सिंग, सुखदीप बाजवा, आराध्या शुक्ला, मयंक मार्कंडे, गुरनूर ब्रार.