Duleep Trophy : ऋतुराज गायकवाडचा संघ श्रेयस अय्यरवर पडला भारी, तीन दिवसातच सामन्याचा निकाल

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील इंडिया सी आणि इंडिया डी संघाचा निकाल लागला आहे. तीन दिवसातच या सामन्याचा निर्णय झाला आहे. ऋतुराज गायकवाडच्या सी संघाने श्रेयस अय्यरच्या डी संघाला चार गडी राखून पराभूत केलं आहे. मानव सुथारने खऱ्या अर्थाने श्रेयस अय्यरच्या संघाचं कंबरडं मोडलं.

Duleep Trophy : ऋतुराज गायकवाडचा संघ श्रेयस अय्यरवर पडला भारी, तीन दिवसातच सामन्याचा निकाल
| Updated on: Sep 07, 2024 | 4:18 PM

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील इंडिया सी संघाने डी संघाला पराभवाचं पाणी पाजलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील डी संघाला 4 विकेट राखून पराभूत केलं. दुसऱ्या डावात डी संघाने विजयासाठी 233 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान तिसऱ्या दिवशी 6 गडी गमवून इंडिया सी संघाने पूर्ण केलं. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 46, आर्यन जुयालने 47, रजत पाटीदारने 44 आणि अभिषेक पोरेलने नाबाद 35 धावांची खेळी केली. दुसरीकडे, मानव सुथारच्या भेदक गोलंदाजीमुळे इंडिया डी संघाचं दुसऱ्या डावात कंबरडं मोडलं. त्याने 19.1 षटकात 7 षटकं निर्धाव टाकत 49 धावा दिल्या आणि 7 गडी बाद केले. यासाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

नाणेफेकीचा कौल जिंकून कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच श्रेयस अय्यरच्या डी संघाच्या वाटेला फलंदाजी आली. पहिल्या डावात डी संघाकडून अक्षर पटेल वगळता सर्वच फलंदाज फेल ठरले. त्याने एकट्याने 86 धावांची खेळी केली. त्यामुळे पहिल्या डावात इंडिया डी संघाला 164 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात इंडिया सी संघाने 168 धावा केल्या आणि 4 धावांची आघाडी घेतली. इंद्रजीथने सर्वाधिक 72 धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरच्या संघाने चांगली खेळी केली. श्रेयस अय्यर आणि देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतकी खेळी केली. पण तीन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. तिघांना मानव सुथारने शून्यावर बाद केलं. त्यामुळे धावांची गाडी रुळावरून घसरली. कसं बसं संघाने 236 धावांपर्यंत मजल मारली. इंडिया सी संघासमोर 236 वजा 4 धावा असं करत 232 धावा आल्या आणि विजयासाठी 233 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान इंडिया सी संघाने 6 गडी गमवून पूर्ण केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

इंडिया डी (प्लेइंग इलेव्हन): देवदत्त पडिक्कल, यश दुबे, रिकी भुई, श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भारत (विकेटकीपर), अथर्व तायडे, अक्षर पटेल, सरांश जैन, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, आदित्य ठाकरे.

इंडिया सी (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बाबा इंद्रजीथ, आर्यन जुयाल, हृतिक शोकीन, विजयकुमार व्यास, मानव सुथार, अंशुल कंबोज, हिमांशू चौहान