महिलेच्या स्वप्नात साप येताच अख्खं गाव हादरायचं, बरोबर 2 दिवसांनी घडायची महाभयंकर घटना, तब्बल 14 वेळा..
अशा काही घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवता येत नाही, मात्र त्या वास्तवात घडल्याचा दावा केला जातो अशीच एक घटना आता समोर आली आहे. ही घटना एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 14 वेळा ग्रामस्थांसोबत घडली आहे.

काही अशा घटना घडत असतात ज्यावर विश्वास देखील ठेवला जाऊ शकत नाही, मात्र अशा घटना वास्तवात घडलेल्या असतात. अशीच एक घटना झाशी जिल्ह्यातल्या चिरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पट्टी कुमर्रा गावामध्ये घडली आहे. ज्या व्यक्तीसोबत हे सर्व घडलं आहे, त्या व्यक्तीचं आयुष्य एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाहीये. सीताराम अहिरवार असं या 75 वर्षांच्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांना गेल्या 42 वर्षांमध्ये तब्बल 14 वेळा सापाने चावा घेतला आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे 14 वेळेला सापानं चावा घेऊन देखील प्रत्येकवेळी या घटनेतून ते सुखरूप बचावले आहेत. या घटनेची चर्चा केवळ त्यांच्या गावातच नाही, तर आता संपूर्ण जिल्ह्यात देखील चांगलीच रंगली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सीताराम हे झाशी जिल्ह्यातल्या पट्टी कुमर्रा गावचे रहिवासी आहेत, ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेबाबत माहिती देताना स्वत: सीताराम यांनी सांगितलं की, जे जेव्हा 25 वर्षांचे होते, तेव्हा त्यांना पहिल्यांदा सापाने दंश केला होता. त्यानंतर त्यांना गावामध्ये असलेल्या खैरापती मंदिरामध्ये नेण्यात आलं, त्यानंतर त्यांच्यावर तिथे काही उपचार करण्यात आले आणि या घटनेतून त्यांचा जीव वाचला. एवढंच नाही तर त्यांनी असा दावा देखील केला आहे की, जेव्हा -जेव्हा त्यांना सापाने चावा घेतला, त्यापूर्वी दोन दिवस आधी आपली पत्नी दिलकुवंर हिच्या स्वप्नात साप येतो, आणि त्यानंतर बरोबर दोन दिवसांनी सर्प दंशाची घटना घडते.
जेव्हा -जेव्हा सीताराम यांची पत्नी दिलकुवंर यांच्या स्वप्नात साप येतो, तेव्हा -तेव्हा सीताराम यांचं संपूर्ण कुटुंब दहशतीच्या छायेत असतं, कारण त्यांच्या स्वप्नात साप येणं हे आता सीताराम यांना दोन दिवसांनंतर साप चावा घेणार आहे, याचा संकेतच बनला आहे, संपूर्ण कुटुंबच नाही तर गावात देखील भीतीचं वातावरण असतं. एवढंच नाही तर येथील ग्रामस्थांच्या वतीनं असा देखील दावा करण्यात आला आहे की, जेव्हा-जेव्हा सीताराम यांच्या पत्नीला असं स्वप्न पडतं, तेव्हा सीताराम यांना अत्यंत सुरक्षित जागी ठेवलं जातं, मात्र तरी देखील त्यांना कोणत्या न कोणत्या प्रकारे बरोबर दोन दिवसांनी सर्पदंश होतोच. अशी घटना एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 14 वेळा घडली आहे, त्यामुळे आता गावासह जिल्ह्यात देखील या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
