Asia cup 2022: ‘हे’ तीन स्टार खेळाडू टीम इंडियावर ओझ बनत चाललेत? या तिघांपेक्षा….

Asia cup 2022: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकले आहेत. खरंतर विजयामुळे माणूस निर्धास्त होतो. पण टीम इंडियाच्या विजयामुळे निर्धास्त होणं दूर राहिलं, उलट काही प्रश्न निर्माण झालेत.

Asia cup 2022: हे तीन स्टार खेळाडू टीम इंडियावर ओझ बनत चाललेत? या तिघांपेक्षा....
team india
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 01, 2022 | 1:19 PM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकले आहेत. खरंतर विजयामुळे माणूस निर्धास्त होतो. पण टीम इंडियाच्या विजयामुळे निर्धास्त होणं दूर राहिलं, उलट काही प्रश्न निर्माण झालेत. तुल्यबळ पाकिस्तान आणि हाँगकाँगच्या संघावर टीम इंडियाने मात केली. पण या दोन विजयात रुबाब दिसला नाही. पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध जिंकलो. पण फलंदाजीत ती दादागिरी जाणवली नाही. काल हाँगकाँग विरुद्ध खेळतानाही पहिल्या 10 षटकात भारताची फलंदाजी टी 20 क्रिकेटला साजेशी नव्हती. त्यात एक संथपणा होता. रोहित शर्मा (Rohit sharma) आणि राहुल द्रविड जोडीने टीम इंडियाची कमान संभाळली, त्यावेळी त्यांनी इंटेंट नावाचा शब्दप्रयोग केला होता. अग्रेसिव इंटेंट म्हणजे आक्रमक क्रिकेट खेळणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आम्ही घाबरणार नाही. टी 20 क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलायची आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

ते इंटेंट कुठे दिसलं नाही

आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या पहिल्या दोन विजयांमध्ये ते इंटेंट कुठे दिसलं नाही. ते गायब होतं. महत्त्वाच म्हणजे संघातील सिनियर फलंदाजाच टीम इंडियाची अडचण वाढवत आहेत. यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहली आहे.

हाच तो राहुल?

काल हाँगकाँग विरुद्ध सामना झाला. त्यावेळी हे फलंदाज मोकळेपणाने, सहजतेने फलंदाजी करतील, अशी अपेक्षा होती. फॉर्म मध्ये परतण्यासाठी ही एक चांगली संधी होती. पण याउलट घडलं. रोहित शर्माने 13 चेंडूत 21 धावा केल्या. तो मोठी खेळी करु शकला नाही. त्यानंतर केएल राहुल टी 20 क्रिकेटला साजेशी फलंदाजी करु शकला नाही. त्याने 36 धावा करण्यासाठी 39 चेंडू घेतले. आयपीएल मध्ये खोऱ्याने धावा करणारा हाच तो राहुल? असा प्रश्न पडला. राहुल क्रीजवर सहजतेने फलंदाजी करत नाहीय, हे लक्षात येत होतं.

विराटने अर्धशतक झळकावलं, पण…

खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या विराट कोहलीने अखेर अर्धशतक झळकावलं. पण त्या अर्धशतकात टी 20 ची मजा नव्हती. ते वनडे सारखं अर्धशतक वाटलं. विराटने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 140 पेक्षा पण कमी होता. आज सिनियर खेळाडू म्हणून या तिघांना वारंवार संधी मिळतेय. पण दीपक हुड्डा, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर सारखे आक्रमक फलंदाजी करणारे क्रिकेटर्स बाहेर बसले आहेत.