
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत महाराष्ट्र आणि उत्तराखंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने चमकदार कामगिरी केली. त्याने उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात झंझावाती शतक ठोकलं आणि संघाला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. महाराष्ट्राची सुरुवात खूपच वाईट झाली. अवघ्या 50 धावांवर तीन विकेट गमावले होते. पण चौथ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार ऋतुराज गायकवाडने डाव सावरला आणि संघाला संकटातून बाहेर काढलं. महाराष्ट्राने 50 षटकात 7 गडी गमवून 331 धावा केल्या आणि विजयासाठी 332 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संघ फक्त 202 धावा करू शकला. महाराष्ट्राने हा सामना 129 धावांनी जिंकला.
विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज गायकवाडने गरजेवेळी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 113 चेंडूंचा सामना करत 124 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त सत्यजीत बच्छावने 56 आणि रामकृष्ण घोषने 47 धावांची खेळी केली. उत्तराखंडकडून गोलंदाजीत देवेंद्र सिंह बोराने 3 विकेट, अभय नेगीने 2 विकेट, मयांक मिश्राने 1 आणि सुचिथने 1 विकेट घेतली. उत्तराखंडकडून फलंदाजी सौरभ रावतने सर्वाधिक 56 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाजी मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. महाराष्ट्राकडून सत्यजीत बच्छावने 3, राजवर्धन हंगरगेकरने 3, सिद्धेश वीरने 2 आणि रामकृष्ण घोषने 2 विकेट काढल्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा अजूनही केलेली नाही. या मालिकेत श्रेयस अय्यर खेळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालं आहे. असं असताना त्याच्या जागेवर आता ऋतुराज गायकवाडने दावा ठोकला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत शतकी खेळी केली होती. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीत शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे चौथ्या स्थानावर उतरून त्याने ही खेळी केली आहे. वनडे संघात ही जागा श्रेयस अय्यरची आहे. त्यामुळे या जागेसाठी ऋतुराज गायकवाड मेहनत घेत असल्याचं दिसत आहे. सध्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरचं कमबॅक काही लवकर होत नाही असं दिसत आहे.