इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. आता या दौऱ्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. पण येथेही इंग्लंडमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूच्या भावाची भीती आहे. त्याने काही वर्षांपूर्वी संघ बदलत झिम्बाब्वेची जर्सी परिधान केली आहे.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं
इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं
Image Credit source: Zimbabwe Cricket Twitter
| Updated on: Jul 22, 2026 | 9:19 PM

टी20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून श्रेयस अय्यर पहिल्या विजयासाठी आतुर आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यापैकी एकाही सामन्यातही विजय मिळालेला नाही. विशेष म्हणजे नाणेफेकीचे सर्व कौल जिंकले, पण विजय काही मिळाला नाही. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला 23 जुलैपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत तीन सामने होणार असून पहिल्या सामन्यात कोण विजय मिळवणार? याची उत्सुकता आहे. कारण भारताला आयर्लंडसारख्या संघाने 0-2 ने मात दिली. इंग्लंडने तर 0-4 ने लोळवलं. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळेल का? याबाबत क्रीडाप्रेमींच्या मनात शंका उपस्थित झाली आहे. झिम्बाब्वे संघ आयर्लंड इतका दुबळा तर नक्कीच नाही. दरम्यान इंग्लंड दौऱ्यात सॅम करनने भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. आता झिम्बाब्वे दौऱ्यात त्याचा भाऊ टीम इंडियाला अडचणीत आणण्यासाठी सज्ज झाला आहे.

पदार्पणाच्या सामन्यात बेन करन कमाल करणार!

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर येणार असल्याने तिथला प्रत्येक खेळाडू मालिकेसाठी आतुर आहे. यात सर्वाधिक आतुरता ही डावखुरा फलंदाज बेन करन याला आहे. झिम्बाब्वेसाठी कसोटी आणि वनडे संघात बेन करनने ओपनिंग केली आहे. आता टी20 संघात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताविरूद्धच्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान दिलं आहे. तसेच प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल आणि आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. संधीचं सोनं करण्यासाठी बेन करन सज्ज असेल यात काही शंका नाही. पण सॅम करनसारखं बेन टीम इंडियाला अडचणीत आणेल का? हा देखील प्रश्न आहे. सॅम करनने टी20 आणि वनडे मालिका जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने टी20 मालिकेत 7 आणि वनडे मालिकेत 6 विकेट घेतल्या होत्या. तर एक दोन सामन्यात छोटी खेळी केली, पण इंग्लंडच्या विजयाचं कारण ठरली.

बेन करनचं वडिलांच्या पावलावर पाऊल

बेन करनला इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. या उलट त्याचा मोठा भाऊ टॉम आणि छोटा भाऊ सॅम हे इंग्लंडकडून खेळले आणि खेळत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बेनने झिम्बाब्वेत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. 2024 मध्ये बेन करन झिम्बाब्वेत आला आणि संघासाठी खेळू लागला. खरं तर झिम्बाब्वे हा त्याचा खरा संघ आहे. कारण त्याचे वडील केविन हे झिम्बाब्वेचे आहेत आणि देशासाठी काही आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आता बेन करन आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून देशासाठी खेळणार आहे.

Follow Us