India Tour Of England : शनिवारी डच्चू मात्र रविवारी सर्फराज इंग्लंडमध्ये, मुंबईकर फलंदाजाची 3 सामन्यांसाठी निवड

Sarfaraz Khan England Tour 2025 : टीम इंडियासाठी खेळणारा मुंबईकर फलंदाज सर्फराज खान याला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली नाही.मात्र त्यानंतर सर्फराज इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. सर्फराजची इंग्लंड दौऱ्यातील 3 सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.

India Tour Of England : शनिवारी डच्चू मात्र रविवारी सर्फराज इंग्लंडमध्ये, मुंबईकर फलंदाजाची 3 सामन्यांसाठी निवड
Sarfaraz Khan Team India
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: May 25, 2025 | 11:05 PM

आयपीएलचा 18 वा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. साखळी फेरीतील अखेरचे सामने खेळवण्यात येत आहेत. त्यानंतर प्लेऑफचा थरार रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने शनिवारी 24 मे रोजी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याला भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आलं. तर ऋषभ पंत याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. करुण नायर याचं 8 वर्षांनंतर कमबॅक झालं. तसेच साई सुदर्शन याला पहिल्यांदाच संधी देण्यात आली. मात्र सर्फराज खान याला डच्चू देण्यात आला.

सर्फराज खान याने इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 10 किलो वजन कमी केलं. सर्फराज या दौऱ्यासाठी सज्ज होता. आपल्याला संधी मिळेल, अशी आशा सर्फराजला होती. मात्र निवड समिताने सर्फराजचा विचार केला नाही. मात्र त्यानंतर काही तासांनी 25 मे रोजी सर्फराज खान टीम इंडियाच्या खेळाडूंसह इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. टीम इंडिया ए इंग्लंडमध्ये काही तासांआधी दाखल झाली आहे. निवड समितीकडून सर्फराजची 3 सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडिया ए इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 फर्स्ट क्लास सामने खेळणार आहे. तर 1 टीम इंडिया ए खेळाडू आपसात खेळणार आहेत. या 3 सामन्यांसाठी सर्फराज खान याला 16 मे रोजी संधी देण्यात आली होती. त्यामुळे सर्फराज खान इंडिया ए सह इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 30 मे ते 16 जून दरम्यान 2 फर्स्ट क्लास सामने खेळवण्यात येणार आहेत. तर त्यानंतर सिनिअर टीम इंडिया विरुद्ध इंडिया ए यांच्यात 1 सामना होणार आहे. या दौऱ्यासाठी सर्फराज खान इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

इंडिया ए इंग्लंडलमध्ये दाखल

टीम इंडिया ए इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. इंग्लंडमध्ये पोहचताच अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावरुन सहकाऱ्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने पोस्ट केलेल्या फोटोत सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, तनुष कोटीयन आणि ऋतुराज गायकवाड दिसत आहे.

इंडिया ए संघाचं वेळापत्रक

अभिमन्यू इश्वरनकडे कॅप्टन्सी

दरम्यान इंग्लंड दौऱ्यात अभिमन्यू इश्वरन टीम इंडिया ए चं नेतृत्व करणार आहे.तर ध्रुव जुरेल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.

इंडिया ए टीम : अभिमन्यू इश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार) (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकुर, ईशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार आणि तनुष कोटीयन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान, तुषार देशपांडे आणि हर्ष दुबे.