
मेलबर्न: टीम इंडियाने (Team India) काल टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) थराराक सामन्यात पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला. या मॅचमध्ये अखेरच्या चेंडू पर्यंत अनेक चढ-उतार पहायला मिळाले. कधी सामना पाकिस्तानच्या (IND vs PAK) बाजूने, तर कधी भारताच्या बाजूने झुकत होता. 31 धावात 4 विकेट गेल्यानंतर भारतात अनेकांनी सामना सोडून दिला होता. पण विराट कोहली आणि हार्दिक पंड्या जिद्द हरले नाहीत. त्यांनी टीम इंडियाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला.
एक नावाची बरीच चर्चा
या मॅचआधी पाकिस्तानकडून एक नावाची बरीच चर्चा होती. पाकिस्तानने त्या खेळाडूंवरुन भारतीय टीमच्या मनात धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वारंवार त्याच्या कामगिरीचे दाखल दिले. तो एका स्पेलमध्ये टीम इंडियावर भारी पडू शकतो, असं चित्र निर्माण केलं गेलं.
त्याच्या नावाने धाक निर्माण करण्याचा प्रयत्न
पण प्रत्यक्षात मॅचमध्यो तो निष्प्रभावी ठरला. त्या गोलंदाजाच नाव आहे, शाहीन शाह आफ्रिदी. मागच्यावर्षी यूएईत टी 20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी पाकिस्तानच्या विजयात शाहीन शाह आफ्रिदीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे वर्ल्ड कपमधल्या या मॅचआधी सुद्धा त्याच्या नावाने धाक निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
फलंदाजाच्या पायाचा अंगठा मोडला होता
उंच, लेफ्ट आर्म Action असलेला हा गोलंदाज दुखापतीमधून नुकताच सावरला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या वॉर्मअप मॅचमध्ये त्याने जबरदस्त गोलंदाजीच प्रदर्शन केलं होतं. अफगाण फलंदाजाच्या पायाचा अंगठा मोडला होता. टीम इंडियाविरुद्ध हा गोलंदाज एकटा भारी पडू शकतो, असं चित्र निर्माण करण्यात आलं होतं.
त्यावेळी महागडा ठरला
पण प्रत्यक्षात कालच्या मॅचमध्ये हाच शाहीन शाह आफ्रिदी प्रभावहीन ठरला. चार ओव्हरमध्ये 34 धावा देऊन त्याने एकही विकेट घेतली नाही. टी 20 क्रिकेटचा विचार करता, 34 धावा फार होत नाहीत. पण त्याने ज्या क्षणी टीमला गरज होती, त्यावेळी किफायती गोलंदाजी केली नाही.
विराटला जमलं ते त्याला जमलं नाही
पहिल्या दोन ओव्हरमध्ये शाहीन शाहने बऱ्यापैकी बॉलिंग केली. पण तिसऱ्या, चौथ्या ओव्हरमध्ये त्याला सूर सापडला नाही. चौथ्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने त्याचा चांगलचा समाचार घेतला. शाहीन शाहच्या 18 व्या ओव्हरमध्ये विराटने 17 धावा वसूल केल्या. तीन चौकार लगावले. आधी टीम इंडियाला 3 ओव्हर्समध्ये 48 धावांची गरज होती. नंतर दोन षटकात विजयासाठी 31 धावा हव्या होत्या. मोठा खेळाडू मोक्याच्या क्षणी टीमसाठी हुकूमी एक्का ठरतो. विराटने ते करुन दाखवलं. शाहीन शाह आफ्रिदीला तेच जमलं नाही.