
श्रीलंका क्रिकेट टीमने आशिया कप 2025 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने मात केली आहे. अफगाणिस्तानने श्रीलंकेला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान कुसल मेंडीस याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 8 बॉलआधी पूर्ण केलं. श्रीलंकेने 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. श्रीलंकेचा हा या साखळी फेरीतील सलग आणि एकूण तिसरा विजय ठरला. तर अफगाणिस्तानचं पराभवासह या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तर श्रीलंकेच्या विजयामुळे बांगलादेशला सुपर 4 फेरीत संधी मिळाली आहे.
मोहम्मद नबी याने 20 व्या ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स ठोकून अफगाणिस्तानला 169 धावांपर्यंत पोहचवलं. नबीने 22 चेंडूत 60 धावा केल्या. तर राशीद खान आणि इब्राहीम झाद्रान या दोघांनी प्रत्येकी 24-24 धावांचं योगदान दिलं. अफगाणिस्तानसाठी सुपर 4 च्या हिशोबाने हा करो या मरो असा सामना होता. नबी, राशीद आणि इब्राहीम या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर श्रीलंकासमोर 170 धावांचं आव्हान ठेवता आलं. त्यामुळे अफगाणिस्तानला विजयाची आशा होती. मात्र कुसल मेंडीस याने नाबाद 74 धावांची खेळी करत श्रीलंकेच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
ओपनिंगला आलेला कुसल श्रीलंकेला विजयी करुनच मैदानाबाहेर परतला. कुसलने श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. कुसलने 52 बॉलमध्ये 10 फोरसह नॉट आऊट 73 रन्स केल्या. तर कुसल परेरा, कॅप्टन चरिथ असलंका आणि कामिंदू मेंडीस या तिघांनीही योगदान दिलं. कुसल परेरा याने 20 चेंडूत 28 धावा केल्या. तर चरिथ असलंका याने 12 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 17 रन्स केल्या. तर कामिंदूने 13 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 26 रन्स केल्या. अफगाणिस्तानसाठी मुजीब उर रहमान, अझमतुल्लाह ओमरझई, मोहम्मद नबी आणि नूर अहमद या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.
श्रीलंकेची विजयी हॅटट्रिक
A disappointing end to our journey at the ACC Men’s T20 Asia Cup 2025. 😕#AfghanAtalan | #AsiaCup2025 | #AFGvSL | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/OGMn0H4RsL
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 18, 2025
दरम्यान श्रीलंकेने अफगाणिस्तानवर मात करत अप्रत्यक्ष बांगलादेशला सुपर 4 मध्ये पोहचण्यास मदत केली आहे. बांगलादेशने साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने जिंकले होते. मात्र बांगलादेशचा नेट रनरेट हा श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या तुलनेत कमी होता. त्यामुळे बांगलादेशचं सुपर 4 चं समीकरण श्रीलंका अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून होतं. अफगाणिस्तान विजयी झाली असती तर बांगलादेशचा पत्ता कट झाला असता. मात्र श्रीलंकेने विजय मिळवला आणि अफगाणिस्तानचं पॅकअप झालं. अशाप्रकारे बी ग्रुपमधून श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला.