
मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर स्टार फलंदाज विराट कोहली आणि गौतम गंभीरवर भडकले आहेत. सोमवारी मॅच संपल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर परस्परांना भिडले. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने लखनौ सुपर जायंट्सवर 18 रन्सनी विजय मिळवला. ही मॅच संपल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये कडाक्याच भांडण पहायला मिळालं.
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या भांडणावर आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी परखड भाष्य केलं आहे. सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि गौतम गंभीरबद्दल आपला राग व्यक्त केला. या प्रकरणात बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीरला कठोर शिक्षा दिली पाहिजे, असं सुनील गावस्कर म्हणाले.
16 मॅचसाठी विराटला 17 कोटी रुपये मिळतात
“मी या भांडणाचे व्हिडिओ पाहिलेत. मी ही मॅच लाइव्ह पाहिली नाही. अशा प्रकारच्या गोष्टी कधी चांगल्या वाटत नाहीत. 100 टक्के मॅच फी चा दंड काय असतो? 100 टक्के मॅच फी किती असते? सेमीफायनल आणि फायनल पकडून विराट कोहलीला 16 मॅचसाठी 17 कोटी रुपये मिळतात. याचा अर्थ प्रत्येक मॅचसाठी 1 कोटी रुपये होतात. ही भरपूरच कमी रक्कम आहे. गौतम गंभीरची काय स्थिती आहे? मला माहित नाही” असं सुनील गावस्कर म्हणाले.
गावस्करांच्या मते काय शिक्षा हवी होती?
“अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा घडणार नाहीत, हे दोघांना सुनिश्चित कराव लागेल. दोघांना खूप कमी दंड झालाय. माझ्या मते दोघांवर एक-दोन मॅचची बंदी घालायला पाहिजे होती. ज्यामुळे खेळाडू आणि टीम दोघांना झटका बसला असता” असं गावस्कर म्हणाले.
दोघांच्या मनात परस्परांबद्दल खूपच कडवटपणा
विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघे दिल्लीचेच आहेत. दोघांमध्ये मतभेद होते. पण ते किती तीव्र स्वरुपाचे आहेत, ते सोमवारच्या भांडणातून समोर आलं. दोघांच्या मनात परस्परांबद्दल खूपच कडवटपणा आहे. कॅमेऱ्यामध्ये दोघांच भांडण, हमरी-तुमरी कैद झालीय. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये या सगळ्या वादाची सुरुवात कशी झाली, या बद्दल तिथे उपस्थित लोकांची वेगवेगळी मत आहेत. काहींच्या मते हे बालिश भांडण आहे. यामुळे क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली, असं सुद्धा काही जणांच मत आहे.