
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं नववं पर्व सुरु आहे. उपांत्य फेरीत भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तानने धडक मारली आहे. जेतेपदासाठी चार संघाच चुरस असताना आयसीसीने टी20 फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी क्रमवारीत मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून आलं आहे. बऱ्याच कालावधीपासून नंबर 1 वर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या स्थानाला धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादवची जागा ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने हिसकावून घेतली आहे. मागच्या काही सामन्यात ट्रेव्हिस हेडची बॅट चांगलीत तळपली होती. सूर्यकुमार यादवसह इंग्लंडचा फिल सॉल्ट, पाकिस्तानचा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनाही क्रमवारीत फटका बसला आहे. ट्रेव्हिस हेडने भारताविरुद्ध केलेल्या खेळीचा त्याला फायदा झाला. त्याच्या गुणांकनात 4 अंकांनी भर पडली आणि 844 गुणांवर पोहोचून अव्वल स्थान गाठलं. विशेष म्हणजे ट्रेव्हिस हेड मागच्या काही सामन्यात टॉप 10 मध्येही नव्हता. मात्र टी20 वर्ल्डकपमधील त्याची कामगिरी वाखाण्याजोगे राहिली आणि त्याचा त्याला फायदा झाला.
सूर्यकुमार यादव सध्या दुसऱ्या स्थानावर असून त्याचं गुणांकन 842 इतकं आहे. ट्रेव्हिस हेडपेक्षा फक्त 2 गुण कमी आहे. त्यामुळे ट्रेव्हिस हेड या स्थानावर जास्त वेळ टिकेल याबाबत शंकाच आहे. कारण उपांत्य फेरीत सूर्यकुमार यादवने चांगली कामगिरी केली तर पुन्हा एकदा नंबर 1 बनण्याची संधी आहे. इंग्लंडच्या फिल सॉलच्या क्रमवारीतही घसरण झाली आहे. 816 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 755 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आधी बाबर आझम तिसऱ्या स्थानावर होता. तर मोहम्मद रिझवान 746 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्याला एका क्रमांकाचा फटका बसला आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरं 716 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी जयस्वालची निवड झाली आहे. मात्र त्याला बेंचवरच बसावं लागलं आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीत नवीन असं काही घडलं नाही. त्यामुळे 672 गुणांसह यशस्वी जयस्वाल सातव्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम 659 गुणांसह आठव्या, वेस्ट इंडिजचा ब्रेंडन किंग 656 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. तर, वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्स 655 च्या गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.