उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा, सामन्यात झालं असं की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत इंग्लंड सामना धाकधूक वाढवणारा होता. या सामन्यात विजय कोणाच्या पारड्यात पडेल हे सांगणं 19व्या षटकापर्यंत कठीण झालं होतं. त्यामुळे धाकधूक वाढली होती. असं असताना या सामन्यादरम्यान काय वाटत होतं? याबाबतचा खुलासा सूर्यकुमार यादवने केला आहे.

उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा, सामन्यात झालं असं की...
उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवने केला मोठा खुलासा, सामन्यात झालं असं की...
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 06, 2026 | 8:34 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताने 253 धावांचं आव्हान ठेवूनही 7 धावांनीच जिंकला. त्यामुळे हा सामना किती धाकधूक वाढवणारा असेल याचा अंदाज येतो. एक क्षण तर असं वाटत होतं की हा सामना भारताच्या हातून जातो की काय? पण बुमराहाने 18व्या षटकात धावगती रोखली आणि इंग्लंडच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेली. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला काय वाटत होतं? निर्णय घेताना काय केलं? असे प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले होते. याबाबतचा खुलासा खुद्द सूर्यकुमार यादव याने सामन्यानंतर केला आहे. उपांत्य फेरीत खूपच नर्वस होतो, असं सामन्यानंतर सांगितलं. कारण पराभव जेतेपदाचं स्वप्न भंग करणारा ठरला असता. त्यामुळे धाकधूक वाढणं सहाजिकच आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘मी खूप नर्वस होतो. जर कोणी माझे हार्ट रेट तपासले असते तर समजलं असतं. भारतात जेतेपदासाठी खेळताना दबाव आणि भीती असं सहाजिकच आहे. पण संघ सहकारी यासाठी उत्साहित आहेत.’ सूर्यकुमार यादवने पुढे सांगितलं की, ‘इंग्लंड पूर्ण सामन्यात टिकून होती आणि धावांचा पाठलाग करताना त्यांनी चांगलं आव्हान दिलं. पण जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि इतर गोलंदाजांनी सामना आमच्याकडे फिरवला. ते खरंच अविश्वसनीय होतं. खरंच हे चांगल्या गोलंदाजीचं दर्शन होतं.’ भारताचा अंतिम फेरीचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

सूर्यकुमार यादवने या विजयाचं श्रेय क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांनाही दिलं. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्हाला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांना थोडं श्रेय द्यावं लागेल. आम्ही जसं आदिल रशीदला एका बाजूने गोलंदाजी करताना पाहिलं, तेव्हा आम्हाला वाटलं की शिवम दुबे त्याच्या विरूद्ध चांगला पर्याय असेल.’ सूर्यकुमार यादव कितीही काहीही म्हणाली तरी गोलंदाजीत भारत कमकुवत दिसत आहे. जसप्रीत बुमराह वगळता एकही गोलंदाज प्रभावी ठरलेला नाही.

Follow Us