
मेलबर्न: ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) पहिला आठवडा खूपच रोमांचक ठरला. काही आश्चर्यकारक निकाल लागले. टुर्नामेंटमधल्या पहिल्या राऊंडचे 16 सामने झाले आहेत. तीन मॅचेसमध्ये धक्कादायक निकाल लागले. वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कपमधून बाहेर गेलीय. चार टीम्सनी सुपर-12 (Super 12) राऊंडमध्ये प्रवेश केला आहे. आता वर्ल्ड कपमधील 12 टीम्स निश्चित झाल्या आहेत.
सुपर-12 राऊंडमधील दोन ग्रुप्स
सुपर-12 मध्ये एकूण 12 टीम्स आहे. दोन्ही टीम्सची 6-6 च्या गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप – 1 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफगाणिस्तानची टीम आहे. पहिल्या राऊंडचा निकाल लागला आहे. या ग्रुपमधील विजेता श्रीलंका आणि ग्रुप बी ची उपविजेता टीम आयर्लंडला सुपर-12 च्या ग्रुप 1 मध्ये स्थान मिळालय. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आयर्लंड या टीम्स ग्रुप 1 मध्ये आहेत.
भारताच्या ग्रुपमध्ये कुठल्या टीम्स?
दुसऱ्या ग्रुपबद्दल बोलायच झाल्यास, इथून भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेला थेट स्थान मिळालं होतं. या चार टीम्स आयसीसी रँकिंगमध्ये टॉप 8 मध्ये होत्या. त्यामुळे त्यांना थेट सुपर-12 मध्ये स्थान मिळालं. आता या ग्रुपमध्ये दोन टीम्सची एंट्री झाली आहे. ग्रुप ए मधील उपविजेता नेदरलँडस आणि ग्रुप बी मधील अव्वल टीम झिम्बाब्वेने ग्रुप 2 मध्ये प्रवेश केला आहे. ग्रुप 2 मध्ये बांग्लादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, आणि नेदरलँडची टीम आहे.
सुपर 12 राऊंडचे सामने कधी सुरु होणार?
शनिवार 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 राऊंडचे सामने सुरु होणार आहेत. पहिला सामना मागच्या वर्ल्ड कपमधील दोन फायनलिस्ट टीममध्ये होणार आहे. ग्रुप 1 मधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन टीम्समध्ये मॅच होईल. होबार्टमध्ये हा सामना होईल. दुसरा सामना अफगाणिस्तान आणि इंग्लंडमध्ये सिडनीच्या मैदानात होईल.