
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियाने धडक मारली आहे. उर्वरित सहा संघांचं गणित अजून सुटलेलं नाही. भारताने आज अमेरिकेविरुद्धचा सामना जिंकला की सुपर 8 फेरीत जाणारा तिसरा संघ ठरेल. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून तीन टी20 वर्ल्डकप चॅम्पियन संघांचं आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यात इंग्लंडचाही समावेश आहे.ब गटात इंग्लंडची सुपर 8 फेरीचं गणित स्कॉटलँड ऑस्ट्रेलिया सामन्यावर अवलंबून आहे. या सामन्यात स्कॉटलँडने बाजी मारली तर इंग्लंडचा पुढचा मार्ग बंद होईल. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या वक्तव्याने क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. नामिबियाला पराभूत केल्यानंतर वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. या दरम्यान इंग्लंडला बाहेर करण्यासाठी पराभूत होण्यासही तयार असल्याचं त्याने सांगितलं. स्कॉटलँडचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडच्या सुपर 8 फेरीतील समीकरणाबाबत हेझलवूडला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की, “बटलरची टीम या फॉर्मेटमध्ये खूप धोकादायक आहे. त्यांचं स्पर्धेतून बाहेर होणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलिया आधीच पात्र ठरली आहे. जर इंग्लंडला बाहेर करण्यासाठी स्कॉटलँडविरुद्ध पराभूत व्हावं लागलं तर टीम त्यावर विचार करू शकते.” त्याच्या वक्तव्यानंतर इंग्लंडच्या पायाखालची वाळू सरकली आहे. स्कॉटलँडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर इंग्लंडला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल.
"If we can get them out of the tournament, that's in our best interest" 👀
Australia bowler Josh Hazlewood says he'd be open to the possibility of easing up on Scotland in their last group game to help knock out England. pic.twitter.com/bfXEH9evjr
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 12, 2024
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांवर स्पर्धेतून बाद होण्याचं सावट आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया एकाच गटात आहेत. या गटातून ओमान आणि नामिबीया आधीच बाहेर गेले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या संघासाठी स्कॉटलँड आणि इंग्लंडमध्ये चुरस आहे. स्कॉटलँडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर या गटातून सुपर 8 फेरीत स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरेल. पण पराभव झाला तर नेट रनरेटवर सर्वकाही ठरणार आहे. कारण स्कॉटलँडने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय आणि 1 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे स्कॉटलँडच्या खात्यात 5 गुण आहेत. इंग्लंडने उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर पाच गुण होतील.