
टीम इंडियाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने नुकत्याच पार पडलेल्या टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेत इतिहास घडवला. अभिषेक शर्मा याने या स्पर्धेत 300 पेक्षा अधिक धावा केल्या. अभिषेक यासह एका टी 20i आशिया कप स्पर्धेत 300 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. अभिषेकने यासह टीम इंडियाला नवव्यांदा आशिया चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर आयसीसीने बुधवारी 1 ऑक्टोबरला टी 20i रँकिंग जाहीर केली. अभिषेकने या टी 20 रॅकिंगमध्ये धमाका केला आहे. आतापर्यंत टी 20i क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गजांना जे जमलं नाही ते अभिषेकने करुन दाखवलं आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आणि इतर फलंदाजांनी आतापर्यंत टी 20i क्रिकेटमध्ये स्फोटक कामगिरीच्या जोरावर असंख्य विक्रम केले आहेत. मात्र यापैकी आतापर्यंत जे कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवण्याची किमया अभिषेकने केली आहे.
अभिषेक याआधीच टी 20i रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी होता. अभिषेकने ताज्या आकडेवारीत आपलं पहिलं स्थान आणखी मजबूत करत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. अभिषेक टी 20i क्रिकेटमधील इतिहासात सर्वाधिक रँकिंग पॉइंट्स मिळवणारा फलंदाज ठरला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, अभिषेकने रेटिंग पॉइंट्समध्ये 930 पार मजल मारली आहे.
टी 20i क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रेटिंग पॉइंटचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान याच्या नावावर होता. डेव्हीडने 919 रेटिंगपर्यंत मजल मारली होती. मात्र अभिषेक त्याच्या पुढचा निघाला. अभिषेकच्या खात्यात डेव्हिडच्या तुलनेत 11 रेटिंग पॉइंट्स जास्त आहेत. अभिषेकच्या नावावर 931 रेटिंग पॉइंट्स आहेत. तसेच अभिषेक 900 किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग पॉइंट्स मिळवणारा क्रिकेट विश्वातील सहावा फलंदाज आहे.
अभिषेकआधी टीम इंडियासाठी सर्वाधिक टी 20i रेटिंगचा विक्रम हा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नावावर होता. सूर्याने 912 रेटिंगपर्यंत मजल मारली आहे. तर विराट 909 पर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरला होता.
टी 20i रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये अभिषेक व्यतिरिक्त तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव विराजमान आहेत. तिलक वर्मा याने आशिया कप अंतिम सामन्यात अर्धशतक खेळी करत भारताला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली. तिलकने नाबाद 69 धावा केल्या. तिलकला या खेळीमुळे रँकिंगमधील तिसरं स्थान कायम राखण्यात यश आलं. तिलकच्या खात्यात 819 रेटिंग पॉइंट्स आहेत.
दुसर्या बाजूला कर्णधार सूर्यकुमार यादव याला मोठा झटका लागला आहे. सूर्याला या रँकिंगमध्ये 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. सूर्याची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. सूर्याच्या नावावर 698 रेटिंग पॉइंट्स आहेत. सूर्याला आशिया कप स्पर्धेत बॅटिंगने काही खास करता आलं नाही. त्यामुळे सूर्याला हा तोटा सहन करावा लागला आहे.