Asia Cup 2025 : दहा वर्षांआधी टी 20I पदार्पण, आता पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध खेळणार! कोण आहे तो?

India vs Pakistan Asia Cup 2025 :आशिया कप स्पर्धेसाठी येत्या काही दिवसांमध्ये भारतीय संघाची घोषणा होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. भारताला या स्पर्धेतील साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळायचे आहेत.

Asia Cup 2025 : दहा वर्षांआधी टी 20I पदार्पण, आता पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध खेळणार! कोण आहे तो?
Shardul Thakur and Sanju Samson
Image Credit source: @IamSanjuSamson X Account
| Updated on: Aug 15, 2025 | 7:13 PM

आशिया कप 2025 स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सकूता लागून आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत खेळण्याबाबत तीव्र विरोध आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अद्याप तरी याबाबत निर्णय झालेला नाही. आशिया कप स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

आशिया कप स्पर्धेत यंदा एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. भारतीय संघासह अ गटात पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा समावेश आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. तसेच यूएईमधील अबुधाबी आणि दुबईतील स्टेडियममध्येच हे सामने होणार आहेत. भारत-पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात आहेत. उभयसंघातील सामना हा 14 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

आतापर्यंत आशिया कप स्पर्धेसाठी एकाही संघाने संघाची घोषणा केलेली नाही. मात्र भारतीय संघात आशिया कप 2025 स्पर्धेसाठी संजू सॅमसन याला संधी मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. संजूने 10 वर्षांपूर्वी टी 20i क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

संजूचं 2015 साली टी 20I पदार्पण

संजूने जुलै 2015 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. मात्र संजूला दरम्यानच्या काळात संजूला टी 20i संघात सातत्याने संधी मिळत नव्हती. मात्र संजूला त्याच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने टी 20i संघात संधी दिली जात आहे.

संजूला आशिया कप स्पर्धेसाठी संधी मिळण्याची दाट शक्यता

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची 17 किंवा 18 ऑगस्टला घोषणा केली जाऊ शकते. मात्र त्याआधी संजूचं भारतीय संघात आशिया कप स्पर्धेसाठी नाव निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे. भारताचा नियमित विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता संजूच्या तोडीचा विकेटकीपर संघात नाही. त्यामुळे संजूचा आशिया कप स्पर्धेसाठी दावा मजबूत आहे.

संजू गेल्या 10 वर्षांपासून भारतासाठी टी 20 क्रिकेटमध्ये खेळत आहे. मात्र संजू आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे यंदा सामना रद्द न झाल्यास संजूची पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची पहिलीच वेळ ठरेल.

संजूची टी 20I कारकीर्द

संजूने भारताचं 42 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. संजूने या दरम्यान 3 शतकं आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 861 धावा केल्या आहेत. संजूने 25.32 च्या सरासरीने आणि 152.38 च्या स्ट्राईक रेटने टी 20i कारकीर्दीत या धावा केल्यात.