
टीम इंडियाच्या विराट कोहली याची क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. विराटने टी 20i नंतर अवघ्या काही महिन्यांपूर्वी कसोटी क्रिकेटलाही रामराम केला होता. आता विराट फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट अखेरचा एकदिवसीय सामना हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल निमित्ताने खेळला. त्यानंतर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. विराट कुटुंबियांसह वेळ घालवत आहे. विराटने काही दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत विराटची दाढी पांढरी पडल्याचं दिसत होतं. विराटच्या या पांढऱ्या दाढीवरुन चांगलीच चर्चा रंगली होती. विराटचं वय झालंय, आता तो वनडेतूनही रिटायर होईल,अशी चर्चा होती. आता विराटबाबत भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने प्रतिक्रिया दिली आहे.
“नाही, मला असं वाटत नाही. पांढरी आणि ग्रे दाढी हे नैसर्गिक आहे. त्यामुळे काय फरक पडणार आहे? खेळाडू तर तसाच राहिल. विराट भय्या निश्चित पुढे खेळत राहतील”, असा विश्वास नवदीप सैनी याने व्यक्त केला. नवदीप सैनी याने स्पोर्ट्स यारीला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं. .
विराटने भारताचं टी 20I, वनडे आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मटेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने स्फोटक बॅटिंगने भारताला अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला आहे. विराटने अनेक रेकॉर्ड केले आहेत. तसेच विराटने कॅप्टन म्हणूनही चमकदार कामगिरी केली आहे.
विराटने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 50 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या होत्या. विराटने 5 सामन्यांमध्ये 54.50 च्या सरासरीने 218 धावा केल्या. विराटने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय मालिका होणार आहे. उभयसंघातील या 3 सामन्यांच्या मालिकेला 19 ऑक्टोबरपरपासून सुरुवात होणार आहे. विराट आणि रोहित शर्मा हे दोघेही फिट असल्यास ते या मालिकेत खेळतील हे निश्चित आहे.