टी 20 Asia Cup स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे तिघेही यंदा खेळणार नाहीत, कोण आहेत ते?
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे 3 फलंदाज यंदा खेळताना दिसणार नाहीत.

आशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 पैकी 2 संघांची आशिया कप स्पर्धेसाठी घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्ताननंतर भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आशिया कप स्पर्धेला 1984 साली सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या आशिया कप स्पर्धेतील सामने हे शारजाह मैदानात खेळवण्यात आले होते. यंदा 17 व्या आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे.
पहिली आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटने झाली होती. तर आता ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. टी 20 फॉर्मेटने स्पर्धेचं आयोजन करण्याची तिसरी वेळ असणार आहे. या टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे 3 फलंदाज खेळताना दिसणार नाहीत. ते 3 खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
विराट कोहली
टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारताचा माजी फलंदाज विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने या फॉर्मेटमधील एकूण 10 सामन्यांमधील 9 डावात 85.80 च्या सरासरीने 429 धावा केल्या होत्या. विराटने आशिया कपमध्ये 132 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या होत्या. विराटने या दरम्यान 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली होती. मात्र विराटने 2024 च्या वर्ल्ड कपनंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे विराट यंदा खेळताना दिसणार नाही.
मोहम्मद रिझवान
पाकिस्तानने जाहीर केलेल्या संघात अनुभवी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या दोघांना संधी दिली नाही. रिझवान आणि बाबर एक वेळ टी 20i संघातील प्रमुख खेळाडू होते. मात्र गेल्या काही महिन्यांमधील सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरीमुळे या दोघांना स्थान गमवावं लागलं. रिझवान टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रिझवानने 6 सामन्यांमध्ये 56.20 च्या सरासरीने 281 धावा केल्या आहेत. रिझवानने या खेळीत 3 अर्धशतकं झळकावली आहेत.
रोहित शर्मा
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने 9 सामन्यांमधील 9 डावात 30.11 च्या सरासरीने 271 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 2 अर्धशतकं ठोकली आहेत. रोहितने 141.14 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्यात. रोहितने 2024 साली भारताला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला होता.
