
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयसीसीने धोनीचा मोठा सन्मान केला आहे. सोमवारी लंडनमध्ये एका कार्यक्रमात धोनीचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करुन त्याचा गौरव करण्यात आला. आयसीसीकडून एकूण 7 खेळाडूंना हा बहुमान देण्यात आला. या 7 खेळाडूंमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. तसेच धोनी आयसीसीकडून हा सन्मान मिळवणारा एकूण 11 वा भारतीय (नववा पुरुष) खेळाडू ठरला आहे.
धोनीने टीम इंडियात 2004 साली पदार्पण केलं. धोनीने टीम इंडियाला 2007 सालचा पहिलाच वर्ल्ड कप त्याच्या नेतृत्वात मिळवून दिला. त्यानंतर धोनीने कर्णधार म्हणून 28 वर्षांची प्रतिक्षा संपवत 2011 साली आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला. तसेच 23 जून 2013 रोजी धोनीने टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी महाअंतिम सामन्यात विजय मिळवून दिला. तसेच धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2009 साली पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला.
धोनीने एकदिवसीय कारकीर्दीत 350 एकदिवसीय सामने खेळले. धोनीने या सामन्यांमध्ये 50.57 च्या सरासरीने 10 हजार 773 धावा केल्या. तसेच धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने 4 हजार 876 धावा केल्या. धोनीने या दरम्यान 6 शतकं झळकावली. तसेच विकेटकीपर म्हणून कॅच आणि स्टपिंगद्वारे 300 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच धोनीने 98 टी 20i सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांद्वारे 1 हजार 617 रन्स केल्या.
टीम इंडियाचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 मधील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध सामना झाला. टीम इंडियाला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. धोनी या सामन्यात रन आऊट झाल्याने भारताचं या स्पर्धेत आव्हान संपुष्ठात आलं होतं. धोनीने या सामन्यानंतर ऑगस्ट 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. खेळात सर्वोत्तम आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आयसीसीकडून हॉल ऑफ फेमद्वारे सन्मान केला जातो.
आयसीसीकडून धोनीचा सन्मान
“Whenever you played against him, you knew the game was never over until he was out!” 😮💨
Cricket greats celebrate MS Dhoni, one of the newest inductees in the ICC Hall of Fame 🤩
📝: https://t.co/oV8mFaBfze pic.twitter.com/118LvCP71Z
— ICC (@ICC) June 10, 2025
सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात धोनी व्यतिरिक्त इतर 6 दिग्गज खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रेमी स्मिथ, साऊथ आफ्रिकेचा चिवट माजी फलंदाज हाशिम आमला, न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू डॅनियल व्हीटोरी आणि पाकिस्तान वूमन्स टीमची माजी कर्णधार सना मीर यांचा समावेश करण्यात आला.
आयसीसीने टीम इंडियाच्या अनेक माजी दिग्ग्जांचा गेल्या काही वर्षांत हॉल ऑफ फेममध्ये स्थान देऊन मान वाढवला आहे. धोनी हा सन्मान मिळवणारा एकूण 11 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीआधी कपिल देव, सुनील गावसकर, बिशन सिंह बेदी,अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, वीनू मांकड, डायना एडुलजी, वीरेंद्र सेहवाग आणि नीतू डेव्हिड यांचा आयसीसीकडून हॉल ऑफ फेममध्ये समावेश आहे.