
टीम इंडियाचा माजी फलंदाज, मास्टर ब्लास्टर, भारतरत्न अशा अनेक विशेषणाने ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकर यांचा शनिवारी मुंबईत जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शनिवारी 1 फेब्रुवारीला बीसीसीआयकडून मुंबईत नमन पुरस्कारांचा आयोजन करण्यात आलं होतं. या विशेष कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. क्रिकेटमधील जवळपास 24-25 वर्षांच्या योगदानासाठी सचिनला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. सचिन या कार्यक्रमानंतर अवघ्या काही तासांनीच पुण्यात एका खास कार्यक्रमाला उपस्थितीत राहिला. सचिनचं या कार्यक्रमात खास स्केच देण्यात आलं.
सचिनने मुंबईपासून अवघ्या काही तासांवर असलेल्या पुण्यात उपस्थिती लावली. पुण्यात चितळे उद्योग समूहाच्या अमृत महोत्सवानिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सचिन या कार्यक्रमाला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होता. सचिनचा कार्यक्रमात चितळे समूहाकडून सन्मान करण्यात आला. सचिनला यावेळेस त्यांचं भलंमोठं स्केच भेट म्हणून देण्यात आलं. सचिनने त्याचं स्वत:चं स्केच पाहिलं. सचिनने स्केच साकारणाऱ्या कलाकाराच्या कलेला दाद दिली.
दरम्यान सचिन तेंडुलकर चितळे समुहाचा ब्रँड अँबॅसेडर आहे. चितळे समुहाने काही महिन्यांपूर्वी 75 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्ताने सचिनला चितळे समुहाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. सचिनने चितळे समुहासाठी जाहिरातही केली आहे. चितळे उद्योग समूहाची जगभरात बाकरवडी पोहोचवणारा समूह अशी ओळख आहे. चितळे उद्योग समुहाचा मिठाई, स्नॅक्स आणि नमकीनसाठी फक्त देशातच नाही तर जगभराच नावलौकीक आहे.
दरम्यान टीम इंडियाने शुक्रवारी 31 जानेवारी रोजी पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये इंग्लंडवर चौथ्या टी 20i सामन्यात 15 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह मालिका जिंकली. टीम इंडियाने पुण्यातील विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी एकतर्फी आघाडी मिळवली. टीम इंडियाचा हा पुण्यातील तिसरा टी 20i विजय ठरला.