Test Twenty Cricket : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलं-मुली एकाच संघात, 80 षटकांची अनोखी स्पर्धा; Test Twenty स्पर्धेकडे जगाचं लक्ष

क्रिकेटमध्ये मुलं आणि मुली एकाच संघातून खेळताना पाहण्याची संधी लवकरच मिळणार आहे. कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान ‘Test Twenty’ ही अनोखी Mixed-Gender क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

Test Twenty Cricket : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलं-मुली एकाच संघात, 80 षटकांची अनोखी स्पर्धा; Test Twenty स्पर्धेकडे जगाचं लक्ष
cricket
| Updated on: Nov 15, 2026 | 1:30 PM

आतापर्यंत तुम्ही मुलांचं क्रिकेट पाहिलं, मुलींचं क्रिकेटही पाहिलं. पण मुलं आणि मुली एकाच संघातून, एकत्र खेळून एकाच विजयासाठी प्रयत्न करताना पाहिलंय का? क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडणार आहे! कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लब (SSC) येथे 14 ते 29 नोव्हेंबरदरम्यान क्रिकेटमधील पहिली Mixed-Gender स्पर्धा रंगणार आहे. 80 षटकांच्या या अनोख्या प्रकाराचं नाव आहे Test Twenty.

या स्पर्धेसाठी जगभरातून 13 ते 21 वयोगटातील 160 युवा क्रिकेटपटूंची निवड केली जाणार असून, त्यांची विभागणी 4 खंडीय संघांमध्ये केली जाईल. प्रत्येक संघात 40 खेळाडू असतील. त्यापैकी 20 मुली आणि 20 मुलं असतील. मुलं आणि मुली एकाच संघातून खेळतील आणि दोघांनी मिळून केलेल्या धावांच्या आधारे संघाचा निकाल ठरेल. या स्पर्धेचा खेळण्याचा प्रकारही तितकाच वेगळा आहे. प्रत्येक सामना एकाच दिवसात खेळवला जाईल. त्यात लाल आणि पांढरा अशा दोन्ही चेंडूंचा वापर केला जाईल.

Loading...

पहिली 40 षटकं दिवसाच्या प्रकाशात पांढऱ्या कपड्यांमध्ये लाल चेंडूने खेळली जातील, तर उर्वरित 40 षटकं SSC च्या झगमगत्या प्रकाशझोतात रंगीत कपड्यांमध्ये पांढऱ्या चेंडूने खेळली जातील. दोन्ही संघांना दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळेल आणि पहिल्या सत्रातील धावा दुसऱ्या सत्रातील धावांमध्ये जोडल्या जातील.

या स्पर्धेचा सर्वात खास नियम म्हणजे ‘Parity Rule’! आयोजकांच्या मते, या नियमानुसार मुलींनी केलेल्या धावा ठरवतील की प्रकाशझोतात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सत्रात मुलांचा विजय होणार की नाही. त्याचप्रमाणे, मुलांनी केलेल्या धावा मुलींच्या विजयासाठी निर्णायक ठरतील. म्हणजेच, या स्पर्धेत कोणाचाही विजय स्वतंत्र नसेल, तर विजय दोघांचा असेल!

स्पर्धेचे संस्थापक गौरव बहिरवानी यांच्या मते, समानतेचं हे तत्त्व केवळ खेळाच्या नियमांपुरतं मर्यादित राहणार नाही, तर सामन्यांच्या प्रक्षेपणातही मुलं आणि मुलींना समान वेळ दिला जाईल.

एबी डिव्हिलियर्स, मॅथ्यू हेडन आणि सर क्लाइव्ह लॉईड यांचा या स्पर्धेच्या सल्लागार मंडळात समावेश आहे. जागतिक निवड समितीच्या अध्यक्षपदी दिल्लीतील प्रसिद्ध प्रशिक्षक राजकुमार शर्मा आहेत, तर स्पर्धेच्या संचालनाची जबाबदारी माईक फोर्डहॅम यांच्याकडे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us