Rishabh Pant : SIX ला कॅचमध्ये बदलता आलं नाही, पण…या चमत्कारामुळेच दिल्लीचा गुजरातवर थरारक विजय

Rishabh Pant : दिल्लीने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 224 धावा केल्या. कॅप्टन पंतने फक्त 43 चेंडूत नाबाद 88 धावा चोपल्या. त्यामुळेच टीमची धावसंख्या 224 पर्यंत पोहोचली. त्याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 7 चेंडूत 26 धावा कुटल्या.

Rishabh Pant : SIX ला कॅचमध्ये बदलता आलं नाही, पण...या चमत्कारामुळेच दिल्लीचा गुजरातवर थरारक विजय
DC vs GT
Image Credit source: AFP
| Updated on: Apr 25, 2024 | 10:59 AM

दिल्ली कॅपिटल्ससाठी सीजनची सुरुवात खराब झाली होती. पण आता हळूहळू या टीमला लय सापडताना दिसतेय. ऋषभ पंतच्या टीमला सूर गवसला आहे. कॅप्टन ऋषभ पंतने या सीजनमध्ये स्लो स्टार्ट केली. पण आता तो आपली बॅट आणि विकेटकिपिंगने कमाल करतोय. दिल्ली कॅपिटल्सची टीम विजयी मार्गावर आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध कालच्या सामन्यात असाच निकाल लागला. अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 4 धावांनी विजय मिळवला. ऋषभ पंत या मॅचमध्ये स्टार ठरला. तो 88 धावांची दमदार इनिंग खेळला. 19 व्या ओव्हरमध्ये एक चमत्कार झाला. अन्यथा त्याची सर्व मेहनत वाया गेली असती.

दिल्ली कॅपिटल्सच होम ग्राऊंड अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होता. ही पैसा वसूल मॅच ठरली. टीमने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 224 धावा केल्या. कॅप्टन पंतने फक्त 43 चेंडूत नाबाद 88 धावा चोपल्या. त्यामुळेच टीमची धावसंख्या 224 पर्यंत पोहोचली. त्याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 7 चेंडूत 26 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात डेविड मिलर आणि साई सुदर्शनने गुजरातला विजय मिळवून देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. पण त्यांना 220 धावा करता आल्या. गुजरातला विजयासाठी 4 धावा कमी पडल्या.

सीमारेषेवर स्टब्सची कमाल

19 व्या ओव्हरमध्ये एक चमत्कार झाला. त्यामुळे दिल्लीला विजय मिळवता आला. गुजरातला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये विजयासाठी 37 धावांची गरज होती. ओव्हरची सुरुवात वाइड चेंडूने झाली. त्यानंतर पहिल्या चेंडूवर राशिद खानने चौकार मारला. रासिख सलामच्या पुढच्याच चेंडूवर राशिद खानने लॉन्ग ऑफला सुंदर शॉट मारला. थेट सिक्स जाणार होता. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या ट्रिस्टन स्टब्सने हवेत सूर मारला व झेल पकडला. पण त्याला संतुलन ठेवता आलं नाही. तो सीमारेषेवर कोसळला. मात्र, तरीही त्याने चेंडूला सीमारेषेला स्पर्श करु दिला नाही.


राशिद खानला विश्वासच बसला नाही

राशिद खानचा फटका स्टब्स अशा पद्धतीने अडवेल याची कोणालाही कल्पना नव्हती. स्टब्सची ही कमाल पाहून सगळे चकीत झाले. राशिद खानला तर अजिबात विश्वास बसला नाही. त्याला वाटलेलं की चेंडूवर षटकार मिळेल. त्यामुळे या चेंडूवर अखेरीस एका धावेवर समाधान मानाव लागलं. स्टब्सने वाचवलेल्या या 5 धावाच निर्णायक ठरल्या. गुजरातला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची आवश्यकता होती. पण राशिद खान सिक्स मारु शकला नाही.