U-19 World Cup 2022: वर्ल्डकप गाजवण्यासाठी सज्ज झालेल्या दोन पुणेकर आणि एका मुंबईकराबद्दल जाणून घ्या…

| Updated on: Jan 15, 2022 | 2:30 PM

यश धुलच्या (Yash dhull) नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) दोन हात करणार आहे. भारताच्या या अंडर-19 टीम मध्ये महाराष्ट्राचे तीन क्रिकेटपटू आहेत.

U-19 World Cup 2022: वर्ल्डकप गाजवण्यासाठी सज्ज झालेल्या दोन पुणेकर आणि एका मुंबईकराबद्दल जाणून घ्या...
Follow us on

U-19 World Cup 2022: वेस्ट इंडिजमध्ये आजपासून भारताच्या अंडर-19 वर्ल्डकप (U-19 World Cup) अभियानाला सुरुवात होत आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. काल दक्षिण आफ्रिकेच्या सिनियर संघाने कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता. आज भारताच्या अंडर-19 टीमला त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. यश धुलच्या (Yash dhull) नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) दोन हात करणार आहे. भारताच्या या अंडर-19 टीम मध्ये महाराष्ट्राचे तीन क्रिकेटपटू आहेत. कौशल तांबे, विकी ओस्तवाल हे दोघे पुण्याचे तर अंगक्रिष रघुवंशी हा मुंबईचा प्लेयर आहे.

कौशल तांबे
कौशल तांबे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा आहे. भारताच्या अंडर -19 संघात त्याची निवड झाली आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून कौशलची भारतीय संघात निवड झाली आहे. चॅलेंजर ट्रॉफी आणि विनू मंकड स्पर्धेतील त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फलंदाजी बरोबर तो ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो.

विनू मंकड करंडक स्पर्धेत तांबेने 54.67 च्या सरासरीने 328 धावा केल्या. चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत त्याने 67 च्या सरासरीने 134 धावा केल्या. कौशल तांबे महाराष्ट्राच्या पश्चिम विभागासाठी खेळतो. नुकत्याच संपलेल्या अंडर-19 आशिया कप स्पर्धेत बॅटने त्याने विशेष चमक दाखवली नाही पण गोलंदाजी करताना 15.16 च्या सरासरीने सहा विकेट घेतल्या.

कौशलचे वडिल एसीपी असून ते पोलीस दलात आहेत. त्यामुळे घरात एक प्रकारची शिस्त आहे. शाळेत असल्यापासून तो क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण सुरु केलं. क्रिकेट हे त्याचं पहिलं प्रेम आहे. कोलकात्यात झालेल्या तीन देशांच्या सीरीजमध्ये कौशलला पहिल्यांदा अंडर-19 संघात संधी मिळाली. त्या कामगिरीमुळेच त्याला अंडर 19 आशिया कप आणि आता वर्ल्डकपमध्ये संधी मिळाली आहे. कौशल पुण्याच्या एसपी कॉलेजचा विद्यार्थी असून तो मागच्या सातवर्षांपासून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतोय.

विकी ओस्तवाल
विकी ओस्तवाही पुण्याचा आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधली चांगल्या कामगिरीमुळे त्याच्यासाठी अंडर-19 संघाचे दरवाजे उघडले. आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने जबरदस्त कामगिरी केली. 8-3-11-3 असे त्याच्या गोलंदाजी पृथक्करण होते. ओस्तवाल एक डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी विकीची अन्य तीन फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटूंबरोबर स्पर्धा असणार आहे.

विनू मंकड करंडक स्पर्धेत विकीने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले होते. त्याने 291 धावा करताना 11 विकेट घेतल्या. आशिया कप स्पर्धेत त्याने 2.29 च्या सरासरीने त्याने आठ विकेट घेतल्या. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन वॉर्मअप मॅचेसमध्ये तो खेळला नाही. पण आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याचा संघात समावेश होऊ शकतो.

अंगक्रिष रघुवंशी

अंगक्रिष रघुवंशी हा अंडर-19 वर्ल्डकपमध्ये निवड झालेला मुंबईचा एकमेव खेळाडू आहे. रघुवंशीची फलंदाजी पाहून आपल्याला किशोरवयातला रोहित शर्मा आठवतो असे मुंबईच्या अंडर-19 चे मुख्य निवडकर्ते अतुल रानडे यांनी सांगितले. अंगक्रिष रघुवंशी मूळचा दिल्लीचा आहे. पण वयाच्या 11 वर्षापासून तो मुंबईत राहतोय. तेव्हापासून तो मुंबईचे प्रतिनिधीत्व करतोय. मुंबईचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक नायर यांच्याकडे त्याने क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. रघुवंशीच टॅलेंट पाहून नायर यांनीच मुंबईत पवईमध्ये त्याच्यासाठी घराची व्यवस्था करुन दिली.

अंगक्रिष रघुवंशी आता फक्त 17 वर्षांचा आहे. त्याने विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत 71.3 च्या सरासरीने 214 धावा केल्या आहेत. कोलकात्यात झालेल्या तीन देशांच्या मालिकेत त्याने 44 च्या सरासरीने 132 रन्स केल्या. त्या तुलनेत चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत त्याची कामगिरी इतकी चांगली नव्हती.

अंडर-19 आशिया कप स्पर्धेत पहिल्या चार सामान्यात सामान्य प्रदर्शन केल्यानंतर त्याने अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक झळकावलं. अंगक्रिषचे पुल आणि ड्राइव्हचे फटके तरुणपणीच्या रोहित शर्माची आठवण करुन देतात असं अतुल रानडे यांनी अलीकडेच म्हटलं होतं.