
उत्तराखंड प्रीमियर लीगमध्ये एक जबरदस्त धमाका झाला. नीरज राठोर या फलंदाजाने स्फोटक फलंदाजी केली. त्याने धमाकेदार फलंदाजी केली. अवघ्या 39 चेंडूत या खेळाडूने झंझावती शतक ठोकले. त्याच्या फलंदाजीची सध्या देशात एकच चर्चा सुरू आहे. 8 चौकार, 8 षटकार अशी स्फोटक फलंदाजी त्याने केली. नीरज राठोर या फलंदाजाने 39 चेंडूत 100 धावा चोपल्या. हरिद्वारच्या या 27 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने टी20मध्ये वेगवान शतक पूर्ण करत क्रिकेट निवड समितीचे लक्ष वेधले आहे. त्याने गोलंदाजांचा घामाटा काढला. प्रत्येक चेंडूवर त्याची ही कमाल पाहून प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले.
नैनीताल टायगर्सविरोधात बॅट तळपली
नैनीताल टायगर्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 199 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर हरिद्वारचा संघ मैदानात उतरला. पण सुरुवातीलाच गडबड उडाली. संघाचे दोन गडी झटपट तंबूत परतले. हरिद्वार संघ दबावात आला. अशा बिकट स्थितीत नीरज राठोर हा फलंदाज मैदानात उतरला. त्याला 2022 मध्ये या संघात संधी मिळाली होती. सुरुवातीचे चेंडू त्याने सबुरी आणि श्रद्धा हा मंत्र जपला. पण खेळपट्टीचा आणि चेंडूचा अंदाज येताच त्याने मग दाणादाण उडवली. गोलंदाजाचा प्रत्येक चेंडू त्याने सोलून काढला. गोलंदाजांनी अनेक डावपेच टाकले पण त्याची बॅट तळपत राहिली. त्याच्या स्फोटक खेळीसमोर गोलंदाजांचा घामाटा निघाला. त्याने एकापाठोपाठ षटकार आणि चौकार ठोकल्याने गोलंदाज गर्भगळीत झाले. त्यांनी नीरजसमोर नांग्या टाकल्या.
250 स्ट्राईक रेटने केल्या धावा
यावेळी नीरज राठोरने या डावात एकूण 8 चौकार, 8 षटकार चोपले. त्याचा स्ट्राईक रेट 250 हून अधिक होता. प्रत्येक षटकात त्याने चेंडूला सीमारेषेबाहेर टोलवले. प्रतिस्पर्धी संघाने त्याला अटकाव करण्याचा जोरकस प्रयत्न केला. पण कोणालाच यश आले नाही. गोलंदाज तर त्याच्यासमोर एकदम हतबल दिसून आले. तर त्याच्यासोबत हिमांशू सोनी याने पण दमदार खेळी खेळली. त्याने 34 चेंडूमध्ये 70 धावांचा टप्पा गाठला. दोन्ही खेळाडूंमध्ये हातातून बाहेर जात असलेला सामना हरिद्वार संघाच्या पारड्यात आला. 199 धावांचे लक्ष्य या दोघांच्या स्फोटक खेळीने अवघ्या 15.5 षटकातच गाठता आला. भारतात चांगल्या खेळाडूंची कमी नाही. पण त्यांना योग्यवेळी संधी मिळणे गरजेचे असल्याचे उपस्थित प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली.