
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जागा पक्की केली आहे. क्वॉलिफायर 1 फेरीत पंजाब किंग्सचा धुव्वा उडवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता जेतेपदापासून एक विजय दूर आहे. नऊ वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी 2016 मध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. मात्र पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठल्याने जेतेपदाची आस आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे माजी मालक विजय माल्ल्या याने संघाचं अभिनंदन केलं आहे. तसेच एक्स खात्यावर आरसीबी संघाचं कौतुक करत खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे.
“पंजाब किंग्जवर एकतर्फी विजय मिळवून आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल आरसीबीचे अभिनंदन. तणावपूर्ण स्पर्धेत ही एक उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी होती. पुरस्काराकडे वाटचाल करत राहा. अंतिम सामन्यात धैर्याने खेळा.” अशी पोस्ट विजय माल्ल्याने लिहिली आहे. विजय माल्ल्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Many congratulations to RCB for an authoritarian win over PBKS tonight to march into the IPL finals. Outstanding all round performance in a high pressure contest. Onwards and upwards towards the title. Play Bold.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) May 29, 2025
विजय मल्ल्या हे आरसीबी संघाचे संस्थापक आहेत. २००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीग संघांसाठी झालेल्या बोलीमध्ये माल्ल्याने आरसीबी संघ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यांनी ते विकत घेतले. पण 2016 मध्ये आर्थिक संकटाचा सामना करणारा आणि कर्जबाजारी झालेला विजय माल्ल्या भारतातून पळून गेला आणि आता इंग्लंडमध्ये राहत आहे. त्याने बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवले आहेत. आरसीबी संघ सध्या युनायटेड स्पिरिट्सच्या मालकीचा आहे.
आरसीबी संघाचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जचा संघ 14.1 षटकात 101 धावांवर सर्वबाद झाला. 102 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आरसीबीला फिल सॉल्टने (56) धमाकेदार सुरुवात दिली. या शानदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 षटकांत 106 धावा केल्या आणि 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला.