वर्ल्डकप संपण्यापूर्वी विराट-रोहितच्या कारकिर्दिला खिळ! बेंचवर बसलेल्या संजू सॅमसनला नव्या संघात संधी

टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित जवळपास सुटलेलं आहे. एकीकडे असं चित्र असताना बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. नवी टीम पाहता रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं पर्व संपल्याची चर्चा रंगली आहे.

वर्ल्डकप संपण्यापूर्वी विराट-रोहितच्या कारकिर्दिला खिळ! बेंचवर बसलेल्या संजू सॅमसनला नव्या संघात संधी
| Updated on: Jun 24, 2024 | 7:15 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचं स्थान जवळपास निश्चित आहे. फक्त जर तरच्या गणितात सर्वकाही अडकलेलं आहे. असं असताना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया या दौऱ्यात पाच टी20 सामने खेळणार आहे. 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान ही मालिका पार पडणार आहे. या दौऱ्यासाठी संघाचं नेतृत्व शुबमन गिल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. तसेच दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना डावलण्यात आलं आहे. टी20 संघातून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं पर्व संपल्याची जोरदार चर्चा आता क्रीडाविश्वात रंगली आहे. कारण क्रीडातज्ज्ञांनी वर्ल्डकपनंतर नव्या खेळाडूंना संधी देण्याची मागणी केली होती. तसेच 2026 वर्ल्डकपसाठी संघाची बांधणी आतापासूनच केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर संघाचं नेतृत्व युवा शुबमन गिलकडे सोपण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या दृष्टीने 2024 हा शेवटचा टी20 वर्ल्डकप आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा यात समावेश आहे. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील संघात असूनही बेंचवर बसलेल्या संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांची संघात निवड करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे या मराठमोळ्या चेहऱ्यांना संघात स्थान मिळालं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपताच नव्या प्रशिक्षकाची घोषणा होणार आहे. कारण राहुल द्रविडचा कार्यकाळ टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंतच आहे. या पदासाठी गौतम गंभीर याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण झिम्बाब्वे दौरा हा व्हीव्हीएस लक्ष्मणच्या अधिपत्याखाली होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिष्णोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.