
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिली वनडे मालिका खेळली जात आहे. पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक गमवली आणि वाटेला गोलंदाजी आली. त्यामुळे मैदानात रोहित शर्मा काय बोलतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागून होतं. अनेकदा रोहित शर्माचं मजेशीर संभाषण समोर आलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी त्याच्या वक्तव्याची आतुरतेने वाट पाहात असतात. असंच काहीसं पहिल्या वनडे सामन्यात पाहायला मिळालं. कर्णधार रोहितने मजेशीर अंदाजात गोलंदाजाला झापलं आणि स्वत:च हसू लागला. अष्टपैलू आणि फिरकी गोलंदाजी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. काही चेंडू श्रीलंकन फलंदाजांच्या समजण्यापलीकडे होते. पण श्रीलंकेचा युवा अष्टपैलू दुनिथ वेल्लालगे मैदानात आला आणि त्याने भारतीय फिरकीपटूंना अडचणीत आणण्यास सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदरच्या पहिल्याच चेंडूवर वेल्लालगेला पायचीत दिलं होतं. पण डीआरएस घेतल्यानंतर निर्णय बदलला आणि त्याला खेळण्याची पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी रोहितने पुन्हा वॉशिंग्टनकडे चेंडू सोपवला.
रोहित शर्माने संघाचं 29वं षटक वॉशिंग्टन सुंदरच्या हाती सोपवलं. या षटकाचा पाचवा चेंडू वेल्लालगेच्या पायावर आदळला. सुंदर आणि विकेटकीपर केएल राहुलने एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. पण पंचांनी ही अपील धुडकावून लावली. असं असताना सुंदर मोठ्या आशेने स्लिपला उभ्या असलेल्या कर्णधारकडे पाहू लागला. त्याला रोहितला डीआरएस घेण्यास सांगायचं होतं आणि तेव्हाच मजेशीर ड्रामा घडला. रोहित शर्माने सुंदरकडे पाहिलं आणि नंतर राहुलकडे पाहिलं आणि पुन्हा सुंदरकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘काय..तू सांग..मला काय दिसतंय येथे..सगळं काम मीच करू का?’ त्यानंतर रोहित शर्मा स्वत:च हसू लागला यावेळी समालोचकही आपलं हसू आवरू शकले नाहीत.
Vintage stump mic banter from @ImRo45 😆
Watch the action from #SLvIND LIVE now on Sony Sports Ten 1, Sony Sports Ten 3, Sony Sports Ten 4 & Sony Sports Ten 5 🤩 📺#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia #RohitSharma pic.twitter.com/HYEM5LxVus
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 2, 2024
दरम्यान, वेल्लालगेने 65 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 67 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकन संघाला 8 गडी बाद 230 धावांपर्यंत मजल मारता आली. तसेच भारतासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं. पण भारताने सर्वबाद 230 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे मालिकेत 0-0 अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढच्या दोन्ही सामन्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे. दुसरीकडे, वेल्लालगेला नाबाद 67 धावा आणि दोन विकेटसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.