
मुंबईतील CEAT क्रिकेट अवॉर्ड सोहळ्यात रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांच्यासह दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. 2023-24 या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला वनडे बॉलर ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मेन्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्काराने गौरविण्यात आले, विराट कोहलीला बॅट्समन ऑफ द ईयर, यशस्वी जयस्वालला मेन्स टेस्ट बॅटर ऑफ द ईयर आणि अश्विनला मेन्स टेस्ट बॉलर ऑफ द ईयर पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी वेगवान गोलंदाद मोहम्मद शमीने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच कर्णधार रोहित शर्माबाबत एक गुपित उघड केलं. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात शमीने जबरदस्त कामगिरी केली होती. अंतिम फेरीत धडक मारण्यात शमीची साथ लाभली. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मानही मोहम्मद शमीला मिळाला आहे.
मोहम्मद शमीने सांगितलं की, “सर्वात पहिलं म्हणजे रोहीत भाई सर्वांना स्वातंत्र्य देतो. ही त्याची सर्वात चांगली बाब आहे. जर तुम्ही त्याचा अपेक्षा पूर्ण करत नसाल तर प्रतिक्रिया दिसायला लागते. तो तुम्हाला सांगतो की असं करायला पाहिजे होतं किंवा असं करण्यासाठी काय केलं पाहिजे होतं किंवा तुम्हाला असं करायचं आहे. पण तरीही तुम्ही तसं करत नसाल आणि अपेक्षा पूर्ण होत नसतील तर स्क्रिनवर पाहून आम्ही समजून जातो की त्याची प्रतिक्रिया कशी येणार आहे.”
मोहम्मद शमीने केलेल्या खुलाशावर श्रेयस अय्यरने दुजोरा दिला. ‘तो काही बोलत नाही, रिकाम्या जागा भरण्यासारखं असतं. पण तो कोणाला काय बोलत आहे? कसं बोलत आहे हे आम्ही सर्व बघून समजून जातो. कारण आम्ही इतक्या वर्षांपासून एकत्र खेळलो आहोत. आम्हाला कळतं.’, असं श्रेयस अय्यर म्हणाला. शमी आणि अय्यरच्या प्रतिक्रियेवर व्यक्त होत रोहित शर्मा म्हणाला की, ‘मी त्यांना मैदानात स्वतः असायला सांगतो. यासाठी मला स्वतः मैदानात उतरावे लागेल. माझ्याकडे सांगण्यासाठी फक्त इतकंच आहे.’