Explainer | आयपीएलआधी डबल्यूपीएल 2024 चे वेध, ऑक्शन, पर्स आणि सर्व काही

WPL Auction 2024 Date | मुंबई इंडियन्सने वूमन्स प्रीमिअर लीगचा पहिला हंगाम जिंकला होता. मात्र आता दुसऱ्या हंगामाचं वेध लागलं आहे. वूमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी ऑक्शनची तारीख निश्चित झाली आहे.

Explainer | आयपीएलआधी डबल्यूपीएल 2024 चे वेध, ऑक्शन, पर्स आणि सर्व काही
| Updated on: Nov 24, 2023 | 8:20 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा पार पडल्यानंतर विविध संघांमध्ये द्विपक्षीय मालिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर 4 महिन्यांनी आयपीएलच्या थराराला सुरुवात होणार आहे. त्याआधी ट्रान्सफर विंडो सुरु झाली आहे. एका बाजूला या ट्रान्सफर विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची अदलाबदल सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट चाहत्यांना डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या मोसमाचे वेध लागले आहेत. या दुसऱ्या मोसमाला नववर्षात फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी अजून 2 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्याआधी आपण या दुसऱ्या हंगामासाठी ऑक्शन कधी होणार, कोणत्या टीमकडे किती पर्स आहे हे सविस्तर जाणून घेऊयात.

डबल्यूपीएलचा दुसरा हंगाम फेब्रुवारीपासून रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी होतात. मुंबई टीमने पहिल्या मोसमात विजेतेपद पटकावलं होतं. मात्र मुंबईसमोर दुसऱ्या हंगामात ट्रॉफी कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. डबल्यूपीएलच्या दुसऱ्या हंगामाच्या ऑक्शनची सुपारी फुटली आहे. ऑक्शनची तारीख ठरली आहे. डबल्यूपीएसलच्या दुसऱ्या हंगामाचा लिलाव हा मुंबईत 9 डिसेंबरला होणार आहे. या दुसऱ्या हंगामातील लिलावासाठी एकूण 5 संघांना प्रत्येकी 1 कोटी 50 लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच 5 संघाकडे गतवर्षातील लिलावातील उर्वरित रक्कम आणि खेळाडूंना करारमुक्त केल्यानंतरची अशी एकूण रक्कम बाकी असेलच.

एकूण किती जागांसाठी लिलाव?

या दुसऱ्या हंगामातील लिलावत फक्त 30 खेळाडूंचं भाग्य फळफळणार आहे. अर्थात लिलावासाठी नोंदणी केलेल्या असंख्य खेळाडूंमधून केवळ 30 जणांचीच निवड केली जाणार आहे. या 30 खेळाडूंमध्ये 21 भारतीय आणि 9 परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. एकूण 5 संघांनी मिळून 60 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. या 60 खेळाडूंमध्ये 21 परदेशी आहेत. तर 29 खेळाडूंना करारमुक्त केलं आहे.

स्पर्धेतील पहिल्या मोसमात एका टीमला 12 कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र फक्त 2 संघांनाच संपूर्ण 12 कोटी रुपये खर्च करता आले. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही संघांनाच 12 कोटी खर्चता आले. तर गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि आरसीबी या 3 संघांना पूर्ण रक्कम खर्च करण्यात अपयश आलं. गुजरात टायटन्सकडे 5, दिल्ली कॅपिट्ल्सकडे 35 आणि आरसीबीकडे 10 लाख रुपये शिल्लक होते.

कोणत्या टीमकडे सर्वाधिक रक्कम?

गुजरात टायटन्स टीमला पहिल्या मोसमात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आलं. गुजरात गेल्या वर्षी पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या म्हणजे पाचव्या क्रमांकावर होती. गुजरातकडे सर्वाधिक रक्कम आहे. गुजरातकडे 5 कोटी 95 लाख रुपयांची रक्कम आहे. कारण गुजरातने अर्धा संघ हा करारमुक्त केला. गुजरात टीमला या लिलावातून फक्त 10 खेळाडूंची गरज आहे. यामध्ये 3 परदेशी खेळाडूंचा समावेश असणार आहे. तर यूपी वॉरियर्स टीमकडे 4 कोटी रुपये आहेत. यामध्ये एक परदेशी खेळाडूचा समावेश आहे.

आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायजी 3 विदेशी खेळाडूंसह एकूण 7 जणांना या लिलावातून आपल्या गोटात घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आरसीबीकडे 3.35 कोटी रुपये आहेत. तसेच उपविजेत्या दिल्लीकडे 3 खेळाडूंसाठी 2 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम आहे. दिल्लीला 3 पैकी 1 खेळाडू विदेशी घ्यावा लागेल. तर मुंबईकडे सर्वात कमी अर्थात 2 कोटी 10 लाख रुपये इतरी रक्कम आहे. मुंबईला 1 विदेशी खेळाडूसह एकूण 5 खेळाडूंची गरज आहे.

पहिल्या मोसमातील महागडे महिला क्रिकेटपटू

दरम्यान गेल्या वर्षी लिलावात 7 खेळाडूंना 2 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली होती. तर 2 खेळाडूंना 3 कोटी मिळाले होते. आरसीबीने स्मृती मंधाना हीच्यासाठी 3 कोटी 40 लाख रुपये मोजले होते. एश्ले गार्डनर हीला गुजरात जायंट्सने 3 कोटी 20 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं होतं. कर नेट सायवर ब्रँट हीला मुंबई इंडियन्सकडून 3 कोटी 20 लाख रुपये मिळाले होते.