WPL 2023, MI vs UPW | यूपीचा मुंबईवर 5 विकेट्सने विजय, पलटणचा अखेरपर्यंत 128 धावांचा बचावाचा शानदार प्रयत्न

मंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत 128 या कमी धावांचा शेवटच्या ओव्हरपर्यंत बचाव केला. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये रंगलेल्या थरारात यूपीने अखेर मुंबईवर 5 विकेट्सने विजय मिळवला.

WPL 2023, MI vs UPW | यूपीचा मुंबईवर 5 विकेट्सने विजय, पलटणचा अखेरपर्यंत 128 धावांचा बचावाचा शानदार प्रयत्न
| Updated on: Mar 18, 2023 | 7:21 PM

नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धत आज शनिवार 18 मार्च रोजी डबल हेडर सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात खेळवण्यात आला. या लो स्कोअरिंग मॅचचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुंबईने यूपी वॉरियर्सला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं.मुंबईच्या गोलंदाजांनी 128 धावांचा शानदार बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये सोफी एक्लेस्टोन हीने सिक्स खेचत यूपीला विजय मिळवून दिला आणि  मुंबई इंडियन्सववर 5 विकेट्सने मात केली.

यूपीकडून ग्रेस हॅरीस हीने सर्वाधिक 39 रन्स केल्या. ताहिला मॅग्राथ हीने 38 धावांचं योगदान दिलं.  तर दीप्ती शर्मा हीने 13 आणि सोफी एक्लेस्टोन हीने 16 धावांची नाबाद खेळी केली. या जोडीनेच यूपीला विजयापर्यंत पोहचवलं. मुंबईकडून अमेलिया केर हीने 2, तर नॅट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज आणि इस्सी वाँग या तिघींनी प्रत्येकी 1 विकेट घेत अखेरच्या ओव्हरपर्यंत चांगली झुंज दिली.यूपी वॉरियर्सचा हा या मोसमातील तिसरा विजय ठरला आहे. तर मुंबई इंडियन्सचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला आहे.

यूपी वॉरियर्सचा थरारक विजय

मुंबईची बॅटिंग

त्याआधी यूपीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन एलिसा हिली हीचा निर्णय यूपीच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. मुंबईकडून हॅली मॅथ्यूज हीने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. इस्सी वाँग 32 रन्सवर रनआऊट झाली. तर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 25 धावांची खेळी. या व्यतिरिक्त यूपी वॉरियर्सच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठू दिला नाही.  मुंबईने ऑलआऊट 20 ओव्हरमध्ये 127 धावा केल्या. यूपीकडून सोफी एक्लेस्टोन हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड या दोघींनी प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अजंली सर्वनी हीने 1 विकेट घेतली.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (wk), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, इस्सी वाँग, हुमैरा काझी, धारा गुजर, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता आणि सायका इशाक

यूपी वॉरियर्स प्लेइंग इलेव्हन | एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), देविका वैद्य, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, पार्शवी चोप्रा, अंजली सरवाणी आणि राजेश्वरी गायकवाड.