
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांची सुरुवात पहिल्या लढतीपासून सुरु झाली. त्यानंतर आता अंतिम फेरीत हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. साखळी फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ तापून सुलाखून निघाला आहे. सुरुवातीच्या दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक करत सलग 8 सामने जिंकले आणि अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यात भारतीय संघाच्या उणीवांवर कांगारूंची करड नजर आहे. त्यामुळे एक चूक घडली की सामन्यात कमबॅक करणं खूप कठीण होईल. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे स्पर्धेला मुकला आणि टीम इंडियाचं गणित काही अंशी बिघडलं असंच म्हणावं लागेल. पण शमीने भेदक गोलंदाजी करत संघाला मोक्याची क्षणी तारलं. पण सहाव्या क्रमाकांचा फलंदाज हवी तशी कामगिरी करू शकला नाही.
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, इशांत किशन आणि श्रेयस अय्यर खातं न खोलता बाद झाले होते. पण त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव सावरला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत हाच कित्ता गिरवला गेला तर सर्वच भार मधल्या फळीच्या फलंदाजांवर येईल. पण त्यात अपयश मिळालं तर सहाव्या क्रमांकावर भरवश्याचं खेळाडू नसल्याचं अधोरेखित झालं आहे.
सूर्यकुमार यादव याला आपली छाप सोडता आली आहे. आक्रमक खेळीमुळे प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार यादव याला खेळण्याची संधी हवी तशी मिळाली नाही. जेव्हा मिळाली तेव्हा कामगिरी करता आली नाही, असं सर्व गणित आहे. मागच्या सहा सामन्यात सूर्यकुमार यादव 2,49,12,22,2*,1 अशी धावसंख्या करून परतला आहे. त्यामुळे त्याच्यावर मोक्याच्या क्षणी विश्वास ठेवणं म्हणजे कठीणच आहे. रवींद्र जडेजाकडूनही खूप काही अपेक्षा करणं चुकीचं ठरेलं. त्यामुळे टॉप 5 फलंदाजांना मोर्चा सांभाळावा लागणार आहे.
फलंदाजीसोबत गोलंदाजीतही उणीव आहे. फक्त शमीमुळे ती झाकली गेली आहे. भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे. पण न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली. उपांत्य फेरीत विल्यमसन आणि मिचेलने 181 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं होतं. हार्दिक पांड्यामुळे सहावा गोलंदाज शॉर्ट पडत आहे. त्यामुळे पाच गोलंदाजांना जबाबदारीने आपली भूमिका बजवावी लागेल. कारण टीम इंडियाकडे त्या ताकदीचा पार्ट टाईम गोलंदाज नाही.