WTC 2027, NZ vs WI : कसोटीच्या दुसर्‍या दिवशी वेस्ट इंडिज फूसsss! न्यूझीलंडला नंबर 1 होण्याची संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होत आहे. न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पहिलाच सामना आहे. वेस्ट इंडिज या सामन्यात मजबूत स्थितीत होता. पण दुसऱ्या दिवशी चित्र बदललं.

WTC 2027, NZ vs WI : कसोटीच्या दुसर्‍या दिवशी वेस्ट इंडिज फूसsss! न्यूझीलंडला नंबर 1 होण्याची संधी
कसोटीच्या दुसर्‍या दिवशी वेस्ट इंडिज फूसsss! न्यूझीलंडला नंबर 1 होण्याची संधी
Image Credit source: BLACKCAPS Twitter
| Updated on: Dec 03, 2025 | 5:34 PM

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी चित्र पालटलं. पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ मजबूत स्थितीत होता. मात्र दुसर्‍या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कमबॅक करून दिलं. पहिल्या दिवशी 70 षटकांचा खेळ झाला होता. खराब प्रकाशमानामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. तेव्हा वेस्ट इंडिजने 9 गडी गमवून 231 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आणि लगेच विकेट मिळाली. त्यामुळे या धावसंख्येत काही वाढ झाली नाही. या धावांचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ उतरला. पण पत्त्यांच्या बंगल्यासारखी फलंदाजी कोसळली. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 167 धावांवर बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडला 64 धावांची आघाडी मिळाली. या धावांच्या पुढे खेळताना न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी विनाबाद 32 धावा केल्या. यासह 96 धावा पदरात पडल्या आहेत.

वेस्ट इंडिजचा डाव

वेस्ट इंडिजची सुरुवात काही चांगली झाली नाही. जॉन कॅम्पबेल फ्कत 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर एलिक अथान्झे 4 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे वेस्ट इंडिजने अवघ्या 10 धावांवर दोन गडी गमावले होते. त्यानंतर टगेनरीन चंद्रपॉल आणि शाई होप यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. या दोघांची विकेट पडली आणि वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव कोसळला. चंद्रपॉलने 169 चेंडूत 3 चौकार मारत 52 धावा केल्या. तर शाई होपने 107 चेंडूत 4 चौकार मारत 56 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.

कर्णधार रोस्टन चेस, जस्टीन ग्रीव्ह्ज, जोहान लायन आणि ओजय शिल्ड यांना खातंही खोलता आलं नाही. टेविन इम्लाचने 14 आणि जेडन सील्स 2 धावा करून बाद झाला. रोचने या सामन्यात नाबाद 10 धावांवर राहिला. न्यूझीलंडकडून जेकब डफीने वेस्ट इंडिजला विकेटचा पंच दिला. त्याने 17.4 षटकात 34 धावा देत 5 विकेट काढल्या. तर मॅट हेन्रीने 22 षटकात 43 धावा देत 3 विकेट, झॅकरी फॉल्क्सने 18 षटकात 32 धावा देत 2 गडी बाद केले.

दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार टॉम लॅथम 14 आणि डेवॉन कानव्हे नाबाद 15 धावांवर खेळत आहे. तिसर्‍या दिवशी या धावसंख्येत भर पडणार यात काही शंका नाही. या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट झालं आहे. आता तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड किती धावा करते आणि वेस्ट इंडिज किती धावांवर रोखते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हा सामना न्यूझीलंडने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिलं स्थान गाठेल.