NZ vs WI 1st Test : पहिल्या दिवशी फक्त 70 षटकांचा खेळ, वेस्ट इंडिजचा संघ चांगल्या स्थितीत
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर वेस्ट इंडिजने पकड मिळवली. पण पहिल्या दिवशी फक्त 70 षटकांचा खेळ झाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंडचा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजशी होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल हा वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला. कर्णधार रोस्टन चेसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडची दाणादाण उडवून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 70 षटकात 9 गडी गमवून 231 धावा केल्या. पहिल्या दिवशी फक्त 70 षटकांचा खेळ झाला. अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवशीचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशीचा खेळ वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी गाजवला. न्यूझीलंडच्या फलंदाजांना मैदानात फार काळ तग धरू दिला नाही. केन विल्यमसन आणि मायकल ब्रेसवेल यांनी त्यातल्या त्यात चांगली खेळी केली. एक वर्षानंतर परतलेल्या केन विल्यमसनने 102 चेंडूत 52 धावा केल्या. तर मायकल ब्रेसवेले 73 चेंडूत 47 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही.
न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे ही जोडी मैदानात उतरली होती. पण डेवॉन कॉनवेला खातंही खोलता आलं नाही. संघाची धावसंख्या 1 असताना डेवॉन कॉनवे केमर रॉचच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर टॉम लॅथम आणि केन विल्यमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. केन विल्यमसन बाद झाला आणि धडाधड विकेट पडण्यास सुरुवात झाली. टॉम लॅथम 85 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. तर रचिन रवींद्रही काही खास करू शकला नाही. त्याला फक्त 3 धावा करता आल्या. विल यंग 14, टॉम ब्लंडेल 29, नाथन स्मिथ 23, मॅट हेन्री 8 धावा करून बाद झाले.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडची शेवटची जोडी मैदानात खेळत होती. झॅकरी फॉल्व्स आणि जेकब डफी ही जोडी मैदानात आहे. झॅकरी फॉल्व्स नाबाद 4, तर जेकब डफी नाबाद 4 धावांवर मैदानात आहेत. आता वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर शेवटची विकेट झटपट काढण्याचं आव्हान आहे. वेस्ट इंडिजकडून केमर रोचने 2, ओजे शिल्ड्सने 2, जस्टीन ग्रीव्ह्जने 2, जेडेन सील्सने 1, जोहान लेनने 1, रोस्टन चेसने 1 गडी बाद केला.
