NZ vs WI 1st Test : WTC 2027 च्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज, जाणून घ्या सर्वकाही
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धा अर्थात चौथं पर्व सुरु आहे. या पर्वात जवळपास सर्वच संघांनी कसोटी सामने खेळले आहे. आता न्यूझीलंड या पर्वात पहिल्यांदा कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन असलेल्या न्यूझीलंडचा पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत उतरणार आहे. पहिल्या पर्वात जेतेपदाची चव चाखल्यानंतर मागच्या दोन पर्वात अंतिम फेरी गाठता आली नव्हती. आता पुन्हा न्यूझीलंडचा संघ चौथ्या पर्वात अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी धडपड करणार आहे. या साखळीत न्यूझीलंडचा पहिलाच सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. न्यूझीलंड वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका न्यूझीलंडच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील कामगिरीवर अंतिम फेरीचं गणित बांधलं जाणार आहे. इतकंच काय तर केन विल्यमसन एका वर्षानंतर कसोटीत खेळणार आहे. चला जाणून घेऊयात कसोटी मालिकेतील पहिला सामना कुठे आणि कधी खेळला जाणार ते…
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी?
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 2 डिसेंबरपासून सुरू होईल.
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठे खेळला जाईल?
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळला जाईल.
भारतीय वेळेनुसार पहिला कसोटी सामना किती वाजता सुरू होईल?
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता सुरू होईल.
भारतात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कसा पाहता येईल?
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. थेट प्रक्षेपण सोनीलिव्हवर तसेच फॅनकोड एप आणि वेबसाइटवर पाहता येईल.
न्यूझीलंडचा संघ (पहिल्या कसोटीसाठी): टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर, केन विल्यमसन, विल यंग.
वेस्ट इंडिजचा संघ: रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), अॅलिक अथानाझे, जॉन कॅम्पबेल, टेगेनारिन चंदरपॉल, जस्टिन ग्रीव्हज, कावेम हॉज, शाई होप, टेविन इमलाच, ब्रँडन किंग, जोहान लेन, अँडरसन फिलिप, केमार रोच, जेडेन सील्स, ओजे शिल्ड्स.
गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची संधी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या गुणतालिकेत न्यूझीलंडला अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर अव्वल स्थान गाठेल. 100 टक्के विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर विराजमान होईल. तसेच 12 गुण मिळतील. सध्या न्यूझीलंडचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. ही मालिका 3-0 अशी जिंकली तर अव्वल स्थान कायम राहील. पहिला सामना ड्रॉ झाला तर 33.33 विजयी टक्केवारीसह सातव्या स्थानी राहील.
