
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. टीम इंडिया या मालिकेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीची सुरुवात करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आज 11 जूनपासून 2023-2025 या साखळीतील अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध गतविजेता ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. महाअंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना आहे. याआधी सलग 2 वेळा भारताने अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. मात्र भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरला. तर ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरलीय. भारताच्या जागी दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पोहचण्याची पहिली वेळ ठरली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिल्याच झटक्यात टेस्ट वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर या संधीसह काही आव्हानही आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.
साऊथ आफ्रिका क्रिकेट टीमचा इतिहास पाहता ते चमकदार कामगिरी करत अनेकदा उपांत्य आणि अंतिम फेरीपर्यंत पोहचतात. मात्र दक्षिण आफ्रिकेचा ऐन क्षणी अर्थात अंतिम सामन्यात पराभूत होण्याचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हटलं जातं. भारतीय संघाने जून 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाचा टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव करत इतिहास घडवला होता.तर ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड वूमन्स टीमने टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मात केली होती.दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे दोन्ही वर्ल्ड कप गमावले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात विजय मिळवून चोकर्सचा शिक्का पुसण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने
All eyes on the 22 players fighting for #WTC25 supremacy 👀
More on the two teams and how to watch the Ultimate Test 👇https://t.co/EI4gV5IRwQ
— ICC (@ICC) June 11, 2025
दक्षिण आफ्रिकेसमोर चोकर्सचा शिक्का पुसण्यासह ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियाने 2023 साली भारताचा पराभव करत मानाची गदा जिंकली होती. तर आता ऑस्ट्रेलिया पुन्हा हा कारनामा करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका कांगारुंना रोखत पहिल्याच झटक्यात टेस्ट वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवणार का? याचीही उत्सुकता चाहत्यांना आहे.