ENG vs IND : यशस्वीचं कडकडीत शतक, ओपनरकडून लव्ह इमोजी आणि फ्लाइंग किस, कुणाला?

Yashasvi Jaiswal Century : यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक ठोकत अप्रतिम सुरुवात केली. त्यानंतर आता यशस्वीने पाचव्या आणि अंतिम सामन्यात कडकडीत शतक झळकावलं. यशस्वीने त्यानंतर हॉर्ट इमोजी करत फ्लाईंग किस दिली. जाणून घ्या.

ENG vs IND : यशस्वीचं कडकडीत शतक, ओपनरकडून लव्ह इमोजी आणि फ्लाइंग किस, कुणाला?
Yashasvi Jaiswal 6th Test Hundred
Image Credit source: @rajasthanroyals x account
| Updated on: Aug 02, 2025 | 7:56 PM

टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी खणखणीत शतक ठोकलं आहे. यशस्वीच्या या शतकी खेळीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत पोहचलीय. यासह भारताकडे दुसऱ्या डावात 189 धावांची आघाडी झाली आहे. या डावात यशस्वीआधी नाईट वॉचमॅन आकाश दीप याने निर्णायक 66 धावांचं योगदान दिलं. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला ही मालिका जिंकण्यापासून रोखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघ इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

यशस्वीचं सहावं शतक

यशस्वीने 51 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सिंगल घेत शतक पूर्ण केलं. यशस्वीला शतकासाठी 127 चेंडूंचा सामना करावा लागला. यशस्वीने या दरम्यान 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. यशस्वीचं हे कसोटी कारकीर्दीतील 6 वं इंग्लंड विरुद्धचं चौथं तर अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील (सुरु मालिकेतील) दुसरं शतक ठरलं. यशस्वीने याआधी लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शतक केलं होतं.

यशस्वीने या शतकानंतर हेल्मेट काढून जल्लोष केला. यशस्वीने या दरम्यान हाताने हॉर्ट इमोजी करत फ्लाईंग किस दिली. यशस्वीने हे असं कुणासाठी केलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला. यशस्वीने ही फ्लाइंग किस स्टेडियमध्ये उपस्थित त्याच्या कुटुंबियांना दिली.

यशस्वीकडून कुटुंबियांना फ्लाइंग किस, पाहा व्हीडिओ

तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

इंग्लंडने पहिल्या डावात टीम इंडियाच्या 224 धावांच्या प्रत्युत्तरात 247 धावा केल्या. इंग्लंडने यासह 23 धावांची नाममात्र आघाडी मिळवली. त्यानंतर भारताने केएल राहुल याच्यानंतर साई सुदर्शन याच्या रुपात 70 धावांवर दुसरी विकेट गमावली. त्यानंतर यशस्वी आणि आकाश दीप या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडने ही जोडी फोडली. भारताने 177 धावांवर आकाश दीपच्या रुपात तिसरी विकेट गमावली. आकाश दीप याने 66 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वीने करुण नायर याच्यासह शतक पूर्ण केलं.