
शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. टीम इंडिया-झिंबाब्वे यांच्यात टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत या 5 सामन्यांच्या मालिकेतील 3 सामने झाले आहेत. टीम इंडिया या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना हा शनिवारी 13 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 4 वाजून 40 मिनिटांनी सरुवात होणार आहे. या मालिकेत आधीच्या सामन्यांमधून अनेक युवा खेळाडूंनी पदार्पण केलंय. त्यानंतर चौथ्या सामन्यातूनही आणखी एक खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
टीम इंडियाला झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली. आता टीम इंडियाकडे चौथा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. या चौथ्या सामन्यातून आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणाऱ्या मराठमोळ्या तुषार देशपांडे याला पदार्पणाची संधी मिळू शकते. तुषार देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो.
तुषारला संधी देण्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधून कुणा एकाला तरी बाहेर बसावं लागणार हे निश्चित आहे. तुषार गोलंदाज असल्याने त्याला आवेश खान याच्या जागी संधी मिळू शकते. तुषारने आयपीएलमधून खऱ्या अर्थाने आपली छाप सोडली आहे. तुषारने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील (IPL 2024) 13 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तुषारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील 8 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता तुषारला पदार्पणाची संधी मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा , तुषार देशपांडे आणि हर्षित राणा.
झिंबाब्वे क्रिकेट टीम: सिकंदर रझा (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.