
भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याने आज लखनौमध्ये बालपणीची मैत्रीण वंशिकासोबत साखरपुडा केला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला कुलदीपचा खास मित्र रिंकू सिंगसह अनेक क्रिकेटपटू उपस्थित होते. या सर्वांनी कुलदीपचे नवीन आयुष्याच्या सुरुवातीबद्दल अभिनंदन केले.
कोण आहे कुलदीपची होणारी पत्नी?
कुलदीप यादवने आज लखनौमध्ये बालपणीची मैत्रीण वंशिकासोबत साखरपुडा केला. वंशिका कानपूरची आहे आणि तिचे वडील एलआयसीमध्ये काम करतात. तसेच वंशिका ऑस्ट्रेलियामध्ये काम करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वंशिका आणि कुलदीप बालपणीचे मित्र आहेत. आता आगामी काळात हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे.
कुलदीप भारताचा स्टार बॉलर
भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नावचा रहिवासी आहे.तो खूप मेहनती असून त्याने क्रिकेटच्या जगात नाव कमावले आहे. तो एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे, त्याने भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. कुलदीप आपल्या आलिशान जीवनशेलीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे अनेक गाड्या आहेत. मात्र त्याने बालपणीच्या मैत्रिणीशी साखरपुडा करून त्याने खरं प्रेम काय असतं हे दाखवून दिलं आहे. .
कुलदीप इंग्लंड दौऱ्यावरही जाणार
कुलदीप यादव यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळत होता. आता तो भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत कुलदीप यादवची गोलंदाजी भारतासाठी महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.
रिंकू सिंगही लग्नबंधनात अडकणार
भारताचा आणखी एक युवा क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि सपा खासदार प्रिया सरोज हेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा साखरपुडा ८ जून रोजी लखनौमध्ये होणार आहे तर १८ नोव्हेंबर रोजी वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये लग्नसोहळा पार पडणार आहे. रिंकू सिंगची होणारी पत्नी प्रिया सरोज ही खासदार आहे. ती मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते.