
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 7 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रावळपिंडी येथे होणार होता. पण पावसामुळे ही मॅच रद्द झाली. खराब हवामानामुळे टॉस सुद्धा होऊ शकला नाही. सामनाधिकाऱ्यांनी मॅच रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप बी मध्ये सेमीफायनलची रेस अजून रोमांचक बनली आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेशिवाय इंग्लंड आणि अफगाणिस्तानची टीम सुद्धा आहे. खास बाब म्हणजे सध्या चारही टीम्स सेमीफायनलच्या शर्यतीत आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत दुसरा सामना होता. पण पावसामुळे दोन्ही टीम्स एक-एक पॉइंट देण्यात आला. दोन्ही टीम्स आता तीन पॉइंटसह सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी दावेदार आहेत. दक्षिण आफ्रिका चांगल्या रनरेटमुळे पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. ग्रुप बी मधून कोणत्या दोन टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचणार जाणून घेऊया. सर्व टीम्ससाठी काय समीकरण असेल?.
ग्रुप बी च गणित कसं आहे?
दक्षिण आफ्रिकेचा एक सामना बाकी असल्यामुळे ते क्वालिफाय करण्यासाठी चांगल्या स्थितीमध्ये आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध मिळालेल्या शानदार विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा रनरेट NRR +2.140 झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड विरुद्ध ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना जिंकला, तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. इंग्लंड विरुद्ध सामना गमावला, तरी त्यांच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता कायम राहिलं. पण त्यासाठी इंग्लंडला दोन्ही सामने हरावे लागतील.
ऑस्ट्रेलियाला कोणावर अवलंबून रहावं लागेल?
दुसऱ्याबाजूला ऑस्ट्रेलियाकडे सुद्धा संधी आहे. अफगाणिस्तान विरुद्ध शेवटचा सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पोहोचेल. पण अफगाणिस्तानकडून पराभव झाल्यास त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंडवरील विजयावर अवलंबून रहावं लागेल.
अफगाणिस्तान-इंग्लंडला किती संधी?
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर इंग्लंडला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आपले दोन्ही सामने जिंकावे लागतील. दुसऱ्याबाजूला अफगाणिस्तानची टीम ग्रुप बी मध्ये तळाला आहे. त्यांना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपले शेवटचे दोन सामने खेळायचे आहेत. अफगाणिस्तानने हे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांना सुद्धा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे.