या कारणामुळे हार्दिक पंड्या विंडीज दौऱ्याला मुकण्याची शक्यता

| Updated on: Jul 20, 2019 | 8:57 PM

यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने आपण उपलब्ध नसल्याचं कळवलंय. त्यामुळे त्याच्या जागी कुणाला संधी दिली जाते ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे फिटनेसमुळे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे.

या कारणामुळे हार्दिक पंड्या विंडीज दौऱ्याला मुकण्याची शक्यता
Follow us on

मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (West Indies Tour) भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्त्वातील समिती वानखेडे स्टेडिअममध्ये दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने आपण उपलब्ध नसल्याचं कळवलंय. त्यामुळे त्याच्या जागी कुणाला संधी दिली जाते ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे फिटनेसमुळे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे.

यावेळी संघात मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. विश्वचषकात शानदार कामगिरी करणारे गोलंदाज जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना आराम दिला जाऊ शकतो. या तीन प्रमुख गोलंदाजांना आराम दिल्यानंतर यंग टॅलेंटचा वापर करण्याची संधी मिळेल. यामध्ये नवदीप सैनीचं नाव अग्रक्रमाने येतं. कारण, विश्वचषकात त्याला स्टँडबायलाही ठेवण्यात आलं होतं. शिवाय खलील अहमद, आवेश खान, दीपक चहर यांनाही विंडीजचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. फिटनेसच्या कारणामुळे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या समावेशाबाबत सस्पेन्स कायम आहे.

हार्दिक पंड्या भारतासाठी गोलंदाजी आणि फलंदाजीतही अनेकदा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. पण गेल्या अनेक दिवसांपासून तो पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करतोय. विश्वचषकातही त्याला या त्रासाचा सामना करावा लागला होता. पण विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केलं. भारताच्या विश्वचषक संघातील धोनी आणि पंड्या सोडता इतर सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असतील.

युवा खेळाडूंनाही संधी मिळण्याची शक्यता

विश्वचषकानंतर कर्णधार विराट कोहली विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेईल, असा अंदाज होता. पण आपण दौऱ्यावर जाणार असल्याचं त्याने स्पष्ट केलंय. तर धोनीच्या जागी रिषभ पंतचं स्थान पक्क मानलं जात आहे. त्याच्यासोबतच युवा खेळाडू संजू सॅमसनलाही संधी दिली जाऊ शकते. यापूर्वीही संजू सॅमसनची निवड झाली होती. पण तो फिटनेस टेस्टमध्ये पास होऊ न शकल्याने त्याला दौऱ्याला मुकावं लागलं होतं. या दौऱ्यात कुणाला संधी दिली जाते, त्याकडे लक्ष लागलंय. यासोबतच इशान किशनलाही यष्टीरक्षक म्हणून संधी दिली जाऊ शकते.

सलामीची जोडी कोण?

मयांक अग्रवालचा भारतीय वन डे आणि टी-20 संघात समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. विश्वचषकात भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज ठरलेला रोहित शर्माला या दौऱ्यातून आराम दिला जातो की नाही तेही महत्त्वाचं असेल. शिखर धवनच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या शुबमन गिलचं स्थानही पक्क मानलं जातंय. दुसरीकडे केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांची सुट्टी केली जाणं निश्चित आहे. तर विजय शंकरही अजून दुखापतीतून सावरलेला नसल्याची माहिती आहे.