Harmanpreet Kaur: टीम इंडियाला गोल्ड मिळवून दिलं दोघींनी, पण हरमनप्रीत कौरला भलत्याच खेळाडूंचे कौतुक
Harmanpreet Kaur: भारत श्रीलंका यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेचा फायनल सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने एक विधान केले ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला १४७ धावांनी पराभूत करून एकतर्फी विजयासह सुवर्णपदक पटकावले. भारतीय पोरींनी मैदान गाजवले आणि गोल्डन कामगिरी केली. भारतीय संघाने एकही सामना न गमावता गोल्डन कामगिरी केली आहे.
या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने गोलंदाजांना श्रेय दिले आणि सांगितले की, “भारताची गोलंदाजी खूप कौतुकास पात्र आहे. विशेषतः पॉवरप्लेमधील सातत्यपूर्ण गोलंदाजीबद्दल दोन वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले.” सामन्यानंतर एकही सामना न हरता सुवर्णपदक जिंकल्याचा अनुभव कसा होता, असे विचारले असता हरमनप्रीत कौर म्हणाली, “ही एक अद्भुत भावना आहे. स्पर्धेपूर्वी आम्ही एकही सामना न हरता विजेतेपद जिंकण्याबद्दल खूप चर्चा केली होती, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, आम्ही स्वतःसाठी जे उच्च मापदंड ठेवले आहेत, ते आम्हाला कायम राखणे आवश्यक आहे.” यावरुन स्पष्ट होते की भारतीय संघाच्या फलंदाजी विभागाचे हरमनप्रीत कौरला कौतुक नाही.
कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, “प्रत्येकजण इतक्या सकारात्मक दृष्टिकोनाने प्रत्येक सामन्याकडे पाहत आहे हे पाहून खूप आनंद झाला. ज्या प्रत्येक खेळाडूला संधी मिळाली, त्याने पुढे येऊन चांगली कामगिरी केली. एक कर्णधार म्हणून आणि एक संघ म्हणून, आम्हाला नेमके हेच हवे होते. एकही सामना न गमावता आणि सातत्याने अशाच दर्जाची कामगिरी करणे. हीच आमची स्वतःकडून अपेक्षा होती, आणि प्रत्येकजण आत्मविश्वासाने हे ध्येय पूर्ण करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे.”
संघातील युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या मिश्रणाबद्दल बोलताना हरमनप्रीत कौर म्हणाली, “आमच्या गोलंदाजी विभागाला विशेष श्रेय द्यायला हवे, कारण आम्ही त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. क्रांती आणि नंदिनीसारख्या युवा गोलंदाजांनी अधिक जबाबदारी स्वीकारली आणि ज्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला, विशेषतः पॉवर-प्लेमधील त्यांची गोलंदाजी उत्कृष्ट होती. यासाठी आमचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि स्टाफने त्यांच्यासोबत खूप जवळून काम केले. युवा खेळाडूंसोबतच, आमचा फिरकी गोलंदाजीचा मारा ही आमची मुख्य ताकद आहे. श्रेयंका आणि दीप्तीसारख्या गोलंदाज सातत्याने सामना जिंकून देणाऱ्या आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये सातत्याने असतात. एकूणच, अनुभव आणि नवीन प्रतिभेचा समतोल उत्तम होता आणि गरजेच्या वेळी प्रत्येकाने चांगली कामगिरी केली.”