Sharad Kapoor : 7 वर्षे न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य, मुंबईत कोट्यवधींची संपत्ती, डिप्रेशनचा सामना अन्…शरद कपूर सांगितली आपबिती
Sharad Kapoor : शरद कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीत आपबिती सांगितली आहे.

बॉलिवूड अभिनेता शरद कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ‘जोश’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकलेल्या शरदचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यानं चित्रपटसृष्टीतील सहकलाकार आणि निर्मात्यांकडे काम मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर तो आर्थिक संकटात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, शरद कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि मालमत्तेबद्दल समोर आलेल्या काही माहितीनंतर या चर्चांना वेगळं वळण मिळालं आहे.
शरद कपूरने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, तो गेली सात वर्षे न्यूयॉर्कमध्ये राहत होता आणि वर्षभरापूर्वीच भारतात परतला. त्यानं सोशल मीडियावर कामासाठी केलेल्या आवाहनाचा उद्देश कोणत्याही सहकलाकाराची बदनामी करणं किंवा आर्थिक मदत मागणं नव्हता, असंही त्यानं सांगितलं. त्याला केवळ पुन्हा अभिनयक्षेत्रात सक्रिय व्हायचं आहे.
विशेष म्हणजे, त्याला एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली असून जानेवारी 2027 मध्ये या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करण्याची त्याची योजना आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमध्येही काम सुरू ठेवण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली आहे.
शरद कपूरच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, त्यानं दिलेल्या माहितीनुसार, तो सध्या राहत असलेलं घर विकून मढ आयलंड परिसरात मोठ्या बंगल्यात राहायला जाण्याच्या तयारीत आहे. या बंगल्यासाठी त्यानं आगाऊ रक्कमही भरली असल्याचं सांगितलं जात आहे. या बंगल्यात सात बेडरूम असून आपल्या चार पाळीव कुत्र्यांना मोकळी जागा मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे.
दरम्यान, क्रिप्टोकरन्सी विक्रीशी संबंधित एका प्रकरणामुळे त्याचं बँक खातं गोठवण्यात आलं आहे. याविरोधात त्यानं अपील केलं आहे. सध्या दैनंदिन खर्चासाठी कोलकाता येथे रेस्टॉरंट चालवणाऱ्या भावांची मदत घेत असल्याचंही त्यानं सांगितलं. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आपण मानसिकदृष्ट्या कठीण काळातून जात असल्याचं शरदनं सांगितलं. काही आरोपांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यातील तणावामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यामुळे कोणाला भेटण्याची किंवा काम करण्याची इच्छाही होत नव्हती. मात्र, आता पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे.
‘जोश’ चित्रपटामुळे मिळाली लोकप्रियता
शरद कपूरनं ‘मेरा प्यारा भारत’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘स्वाभिमान’ या मालिकेतील ग्रोव्हरच्या भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘जोश’ चित्रपटामुळे तो विशेष लोकप्रिय झाला. या चित्रपटात त्यानं साकारलेली मॅक्सची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. याशिवाय ‘लक्ष्य’, ‘वॉन्टेड’ आणि ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांतही तो दिसला.
