भारताची धडाकेबाज सुरुवात, पण अवघ्या 18 धावात तीन शिलेदार तंबूत, टीम इंडियावर दबाव वाढला

| Updated on: Mar 28, 2021 | 6:34 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा डाव थोडासा अस्थिर झाला (three Indian player out in 18 runs)

भारताची धडाकेबाज सुरुवात, पण अवघ्या 18 धावात तीन शिलेदार तंबूत, टीम इंडियावर दबाव वाढला
Follow us on

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात सलामीवीर रोहित शर्माच्या विकेटनंतर भारताचा डाव थोडासा अस्थिर झाला. इंग्लंडने आज टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाच्या सलामीवर जोडीने ते आमंत्रण स्वीकारत इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुण्यास सुरुवात केली. मात्र, सलामीवर रोहित शर्माच्या विकेटनंतर भारतीय संघाला गळती लागली. काही धावांच्या अंतरावर एकामागे एक असे तीन मातब्बर फलंदाज बाद झाले. त्यामुळे टीम इंडियावरील दबाव आणखी वाढला (three Indian player out in 18 runs).

एकापाठोपाठ तीन खेळाडू बाद

टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. मात्र, इंग्लंडच्या आदिल रशीदने रोहित शर्माला फिरकीच्या जाळ्यात ओढलं. त्यामुळे रोहित 15 व्या षटकात बाद झाला. त्याने 37 चेंडूत 37 धावा केल्या. यामध्ये 6 चौकारांचा समावेश आहे. रोहित शर्मानंतर आदिल रशीदने शिखर धवनला देखील 16 व्या षटकात फिरकीच्या जाळ्यात अडकवत झेलबाद केलं. त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला देखील आज त्याचा जलवा दाखवता आला नाही. विराट कोहली 17 व्या षटकात मोईन अलीच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.

18 धावात मातब्बर खेळाडू बाद

विशेष म्हणजे रोहित बाद झाला तेव्हा भारताच्या धावा या 103 होत्या. त्यानंतर धवन बाद झाल्यावर 117 धावा होत्या आणि विराट कोहली बाद झाला तेव्हा 121 धावा होत्या. याचाच अर्थ अवघ्या 18 धावांमध्ये भारताचे तीन शिलेदार आणि मातब्बर फलंदाज बाद झाले. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला (three Indian player out in 18 runs).

विराट मोईन अलीच्या चेंडूवर नऊ वेळा बाद

मोईन अलीच्या चेंडूवर विराट कोहली आज पहिल्यांदा बाद झालेला नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराट मोईन अलीच्या चेंडूवर आतापर्यंत 9 वेळा बाद झाला आहे. तर आदिल रशीदच्या चेंडूवरही नऊ वेळा बाद झालाय. त्याचबरोबर विराट न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या चेंडूवर दहावेळा बाद झाला आहे.