
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पराभवाने आपल्या अभियानाची सुरुवात केली आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेटने पराभव झाला. या टेस्ट मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक झेल सोडले. त्यामुळे इंग्लंडच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये 465 धावा केल्या. त्याशिवाय खालच्या फळीतील फलंदाजांनी दोन्ही इनिंगमध्ये निराश केलं. लीड्स टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतरही टीमचा कॅप्टन शुबमन गिलने खेळाडूंवर गर्व व्यक्त केला. मला माझ्या खेळाडूंवर अभिमान आहे असं गिल म्हणाला.
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर शुबमन गिल निराश दिसला. पण त्याने टीमवर अभिमान व्यक्त केला. मॅचनंतर तो बोलला की, “ही कमाल टेस्ट मॅच होती. आमच्याकडे संधी होत्या. पण त्या संधी आम्हाला साधता आल्या नाहीत. आम्ही कॅच सोडल्या, फलंदाजीत खालच्या क्रमांकावर धावा झाल्या नाहीत. पण मला माझ्या टीमवर गर्व आहे. एकूण मिळून आम्ही चांगला प्रयत्न केला”
कॅच सोडण्यावर गिल काय म्हणाला?
“आम्ही विचार करत होतो की, 430 च्या आसपास धावा करुन डाव घोषित करायचा. पण दुर्देवाने आम्ही धावा करु शकलो नाही. येणाऱ्या सामन्यात सुधारणा करु” असं गिलने सांगितलं. या टेस्ट मॅचमध्ये कॅच सोडण्यावरुन शुबमन गिलने आपल्या खेळाडूंचा बचाव केला.
आम्ही चूकांमधून शिकू
“अशा प्रकारच्या विकेटवर सहज संधी मिळत नाही. पण आमच्याकडे युवा टीम आहे. आम्ही चूकांमधून शिकू आणि पुढे चांगलं प्रदर्शन करु. आम्ही पहिल्या सेशनमध्ये चांगली बॉलिंग केली होती. सहज धावा दिल्या नाहीत. पण चेंडू जुना झाल्यानंतर तो थांबवणं कठीण असतं” असं शुबमन गिल म्हणाला.
फिल्डिंगमधील पाच वर्षातील हे सर्वात खराब प्रदर्शन
भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी खूप खराब फिल्डिंग केली. सलामीवर यशस्वी जैस्वालने अनेक कॅच सोडल्या. त्यामुळे भारतावर दबाव वाढला. फिल्डिंगच्या बाबतीत टीम इंडियाच मागच्या पाच वर्षातील हे सर्वात खराब प्रदर्शन आहे. रिपोर्ट्सनुसार 2019 नंतर पहिल्यांदा असं झालय जेव्हा भारताने कुठल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त कॅच सोडल्या आहेत.