न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजांची नांगी, पहिला डाव 242 धावांवर आटोपला

| Updated on: Feb 29, 2020 | 10:33 AM

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. भारताचा पहिला डाव पहिल्याच दिवशी अवघ्या 242 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजांची नांगी, पहिला डाव 242 धावांवर आटोपला
Follow us on

(Ind vs NZ Christchurch test) ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. आघाडीच्या फळीची पडझड झाल्याने भारताला मोठी मजल मारता आली नाही. भारताचा पहिला डाव पहिल्याच दिवशी अवघ्या 242 धावांवर आटोपला. भारताकडून पृथ्वी शॉ 54, चेतेश्वर पुजारा 54 आणि हनुमा विहारीने 55 धावा केल्या. तर तळाचे फलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी 26 धावांची भागीदारी केल्याने भारताला इथवर मजल मारता आली. (Ind vs NZ Christchurch test)

या कसोटीतही नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी आश्वासक सुरुवात केली. मात्र ट्रेण्ट बोल्टने मयांकला 7 धावांवर पायचित करुन, भारताला पहिला धक्का दिला.

दुसरीकडे पृथ्वी शॉने गेल्या सामन्यातील काहीशी कसर या सामन्यात भरुन काढली. पुजाराच्या साथीने त्याने डाव सावरला. पृथ्वी शॉने अर्धशतक झळकावून न्यूझीलंडच्या भेदक माऱ्याचा निडरपणे सामना केला. मात्र 54 धावांवर जेमीसनने त्याला बाद करुन, त्याच्या फटकेबाजीला वेसण घातली. पृथ्वी शॉ बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 2 बाद 80 अशी होती.

यानंतर मग चेतेश्वर पुजाराच्या साथीला कर्णधार विराट कोहली आला. मात्र त्याला न्यूझीलंडने जम बसू दिला नाही. टीम साऊदीने अवघ्या तीन धावांवर त्याला पायचित करुन भारताला मोठा धक्का दिला. त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेही अवघ्या 7 धावा करुन माघारी परतल्याने, भारताची अवस्था 4 बाद 113 अशी झाली.

यानंतर मग पुजाराने हनुमा विहारीच्या साथीने डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी आधी जम बसवला आणि मग हळूहळू धावा जमवायला सुरुवात केली. या दोघांनीही शतकं झळकावून, भारताला 190 धावांचा टप्पा ओलांडून दिला. ही जोडी जमली असं वाटत असतानाच, हनुमा विहारी वॅग्नरचा शिकार ठरला. विहारीने 55 धावा केल्या.

हनुमा विहारी बाद झाल्यानंतर लगेचच 3 धावांच्या फरकाने पुजाराही माघारी परतला. पुजाराने 54 धावा केल्या. पुजारा बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या 6 बाद 197 अशी होती. मग रिषभ पंत 12, रवींद्र जाडेजा 9, उमेश यादव शून्यावर बाद झाले. मग शमीने दोन षटकार ठोकत 16 तर बुमराहने नाबाद 10 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून पहिल्या कसोटीत दमदार पदार्पण करणाऱ्या कायल जेमीसनने या कसोटीतही भेदक मारा केला. त्याने भारताचा निम्मा संघ माघारी धाडला. तर टीम साऊदी आणि ट्रेण्ट बोल्टने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.