Vinesh Phogat disqualified : विनेश फोगाट विरोधात कारस्थान, कुटुंबाचे फेडरेशनवर गंभीर आरोप

Vinesh Phogat disqualified : आज सगळ्या भारताच मन मोडलं. ऑलिम्पिकमध्ये सगळ्यांच्या नजरा सुवर्णपदकाकडे लागल्या होत्या. विनेश फोगाट सुवर्णपदक आणणार म्हणून सर्वांमध्ये उत्साह होता. पण सामन्याच्या दिवशी वजन जास्त झाल्यामुळे विनेश फायनलसाठी अपात्र ठरली. यावरुन आता राजकारण सुरु झालय. विनेश फोगाटच्या कुटुंबाने फेडरेशनवर गंभीर आरोप केले आहेत.

Vinesh Phogat disqualified : विनेश फोगाट विरोधात कारस्थान, कुटुंबाचे फेडरेशनवर गंभीर आरोप
vinesh phogat disqualified
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 07, 2024 | 1:16 PM

भारताला खूप मोठा धक्का बसला आहे. पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतूनत आज गोल्ड मेडलची अपेक्षा होती. भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगाट 50 किलो वजनी गटातून फायनलसाठी पात्र ठरली होती. विनेशने सर्वात आधी जगातील नंबर 1 कुस्तीपटू जपानच्या युई सुसाकीला हरवलं. एकही सामना न हरण्याचा रेकॉर्ड तिच्या नावावर होता. त्यानंतर सेमीफायनलमध्ये क्युबाची कुस्तीपटूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेशचा फॉर्म पाहता तिच्याकडून गोल्ड मेडल निश्चित मानलं जात होतं. सगळ्या देशात प्रचंड उत्साह होता. पण आज दुपारी 12 च्या सुमारास विनेश अपात्र ठरल्याची बातमी आली. तिच वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त होतं. म्हणून विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. या बातमीने सगळ्या भारतामध्ये खळबळ उडाली आहे. संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत.

विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशच्या कुटुंबाने फेडरेशनवर गंभीर आरोप केले आहेत. फेडरेशनने तिच्याविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे. विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी म्हणाले की, ‘100 ग्रॅम वजन किती जास्त असतं. डोक्यावरच्या केसांमुळे सुद्धा 100 ग्रॅम वजन वाढतं’ त्याशिवाय त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृज भूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र ठरली त्यामध्ये सरकार आणि बृज भूषण शरण सिंहचा हात असल्याचा आरोप केला आहे.

‘काल वजन का जास्त नव्हतं?’

“ही मन मोडणारी बातमी आहे. हे राजकारण सुरु आहे. हे षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजनामुळे कोणाला काढलं जातं?. डोक्यावरच्या केसांमुळे सुद्धा 100 ग्रॅम वजन वाढतं. अजूनपर्यंत विनेश फोगाट बरोबर मी बोललेलो नाही. विनेशने वारंवार म्हटलय माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आलय. जयपूर आणि अन्य ठिकाणी ती या बद्दल बोलली आहे. फोगाट बाहेर गेल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. काल फाईट झाली त्यावेळी तिचं वजन जास्त का नव्हत?” असा सवाल राजपाल राठी यांनी विचारला.


विनेश किती राऊंड पार करुन फायनलमध्ये पोहोचलेली?

विनेशने तीन राऊंड पार करुन फायनलमध्ये प्रवेश केला होता. विनेशने सर्वात आधी जपानच्या युई सुसाकीला 3-2 ने हरवलं. पुढच्या फेरीत युक्रेनच्या ओकसाना लिवाचला हरवलं. विनेशने ओकसानाला 7-5 ने हरवलं. सेमीफायनलमध्ये तिने गुजमॅन लोपेजला पराभूत केलं. विनेशने सेमीफायनलमध्ये 5-0 असा शानदार एकतर्फी विजय मिळवला. आज रात्री 12.30 वाजता विनेशचा फायनल सामना होणार होता.