आमच्या घरी नन्ही परी, मोहम्मद शमीकडून बाळाचा फोटो शेअर

टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या घरी नन्ही परी आली आहे. मोहम्मद शमी सध्या टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.

आमच्या घरी नन्ही परी, मोहम्मद शमीकडून बाळाचा फोटो शेअर
| Updated on: Feb 04, 2020 | 10:43 AM

मुंबई : टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) घरी नन्ही परी आली आहे. शमीचा भाऊ आणि वहिनीला मुलगी झाली. शमीने सोमवारी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. “माझ्या कुटुंबात आणखी एक बाळ आलं आहे. राजकुमारीला जन्माच्या शुभेच्छा. अत्यंत लाडात तू मोठी व्हावी. या जगात तुझं स्वागत आहे. भावाच्या कुटुंबाला शुभेच्छा” असं शमीने म्हटलं आहे. (Mohammad Shami)

मोहम्मद शमी सध्या टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. शमीच्या घरी सध्या आनंद असला, तरी काही महिन्यांपूर्वी त्याच्या कुटुंबात मोठा तणाव होता. शमीची पत्नी त्याला सोडून गेली आहे. शमीही एका मुलीचा पिता आहे. नुकतंच वसंत पंचमीला शमीने लेकीचा फोटो शेअर केला होता.


दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यावर मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी केली. तिसऱ्या टी 20 सामन्यात शमीच्या शेवटच्या षटकाने सामन्याचा निकाल बदलला. शमीने 4 चेंडूत केवळ 2 धावा दिल्या होत्या. हा सामना टाय झाल्याने, सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला.

या सामन्यानंतर शमी म्हणाला होता, “मी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होतो. पहिला यॉर्कर टाकताना चेंडू हातातून निसटला आणि त्यामुळे सिक्सर गेला. त्यानंतर माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. आम्ही आता हरलो आहोत असंच वाटत होतं. त्याचवेळी मी आता चेंडू वाया घालवायचे याचा विचार करत होतो. त्यावेळी एक बाऊन्सर टाकला, त्यावेळी विल्यमसन आऊट झाला. ज्यावेळी धावसंख्या समान झाली त्यावेळी मी आणखी एक चेंडू वाया घालवण्याच्या विचारात होतो. मी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी ठरलो”